नवी दिल्ली / वृत्तसंस्था
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा 2022 मधील पहिला विदेश दौरा 2 ते 4 मे या काळात होणार आहे. ते जर्मनी, डेन्मार्क आणि फ्रान्स या देशांना भेटी देणार आहेत. ही माहिती देशाच्या विदेश व्यवहार विभागाने बुधवारी दिली. या दौऱयात ते या देशांच्या प्रमुखांशी द्विपक्षीय संबंध आणि जागतिक घडामोडींवर चर्चा करणार आहेत.
जर्मनीच्या दौऱयात पंतप्रधान मोदी चान्सलर ओलाफ शूल्झ यांच्याशी द्विपक्षीय संबंध आणि गुंतवणूक या विषयांवर चर्चा करतील. तसेच दोन्ही नेते सहाव्या भारत-जर्मनी सरकारांतर्गत सल्लागार परिषदेत सहभागी होतील. या परिषदेत भारत आणि जर्मनीचे अनेक मंत्रीही व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सहभागी होण्याची शक्यता आहे. जर्मनीच्या नव्या सरकारशी हा भारताचा पहिलाच व्यापक संवाद असेल. दोन्ही नेते एका व्यापारी परिषदेलाही संयुक्तरित्या संबोधित करणार आहेत, अशी माहिती देण्यात आली.
डेन्मार्कच्या पंतप्रधानांचे निमंत्रण
डेन्मार्कचे पंतप्रधान मेटे प्रेड्रीकसन यांच्या आमंत्रणावरून पंतप्रधान मोदी या देशाचा दौरा करणार आहेत. कोपेनहेगन येथे दोन्ही नेते द्विपक्षीय संबंधांवर चर्चा करतील. तसेच दुसऱया भारत-नॉर्डिक परिषदेतही सहभागी होतील. या देशाच्या महाराणी मार्गेथे (दुसऱया) यांच्याशीही पंतप्रधान मोदी संवाद साधणार आहेत.
फ्रान्सला अल्पकालीन भेट
या दौऱयावरून परतताना पंतप्रधान मोदी फ्रान्समध्ये अल्पकाळ थांबणार आहेत. अध्यक्षपदी दुसऱयांदा निवडून आलेल्या इमॅन्यूएल मॅक्रॉन यांची ते भेट घेणार असून त्यांच्याशी चर्चा करणार आहेत. यावर्षी फ्रान्स आणि भारत यांच्यातील राजनैनिक संबंधांना 75 वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त दोन्ही नेत्यांची भेट होत आहे.