ऑनलाईन टीम / तरुण भारत :
उस्मानाबादसाठी ठाकरे सरकारने मंजूर केलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा प्रस्ताव केंद्रीय आयुर्विज्ञान आयोगाने नाकारला आहे. राज्यात स्थापन झालेल्या शिंदे-फडणवीस सरकारकडून ठाकरे सरकारच्या निर्णयांना स्थगिती देण्याचा धडाका सुरू असतानाच आता केंद्रीय आयुर्विज्ञान आयोगानेही ठाकरे सरकारचा मंजूर प्रस्ताव नाकारल्याने ठाकरे सरकारसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करणे हा ठाकरे सरकारचा महत्त्वपूर्ण प्रकल्प होता. ठाकरे सरकारने मोठा गाजावाजा करत या प्रस्तावला मंजूरी दिली होती. त्यानंतर केंद्रीय आयुर्विज्ञान आयोगाच्या समितीने उस्मानाबाद येथे वैद्यकीय महाविद्यालयाच्या जागेस 4 फेब्रुवारी 2022 ला भेट देऊन त्याची पाहणी केली व यात काही गंभीर त्रुटी काढल्या. या त्रुटींची पूर्तता करण्यासाठी तत्कालीन वैद्यकीय मंत्री यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात आला. मात्र, ठाकरे सरकारकडून हा विषय गांभीर्याने घेतला गेला नाही, असा ठपका ठेवत 25 ऑगस्ट 2022 ला आयोगाने प्रस्तावित शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला शैक्षणिक वर्ष 2022-23 मध्ये मंजूरी नाकारल्याचे पत्र पाठविले.
अधिक वाचा : वादळी पाऊस पुढील काही दिवस कायम राहणार
आयुर्विज्ञान आयोगाने हा प्रस्ताव फेटाळल्याने यंदा हे महाविद्यालय सुरू होण्याची शक्यता मावळली आहे. यावषी महाविद्यालयात प्रवेश प्रक्रिया होणार नाही.