आयटकतर्फे पणजीत उद्या कामगार जागृती रॅली
प्रतिनिधी /पणजी
किमान समान वेतनाच्या बाबतीत राज्यात कामगारवर्गाची छळवणूक सुरू असून अशा कामगारांना किमान 750 रुपये किमान वेतन द्यावे. त्याचबरोब खाजगी आस्थापने आणि कंपन्यातही कामाची वेळ आणि कामाचे दिवसही कमी करावे अशा मागण्या उद्या होणाऱया जागतिक कामगारदिनी करणार आहोत, अशी माहिती आयटक नेते ऍड. ख्रिस्तोफर फोन्सेका यांनी दिली आहे.
अखिल भारतीय ट्रेड युनियन काँग्रेसतर्फे पणजी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. त्यावेळी कामगार नेते प्रसन्न उटगी आणि ऍड. सुहास नाईक यांचीही उपस्थिती होती.
उद्या दि. 1 मे रोजी आयटकतर्फे जागतिक कामगारदिन साजरा करण्यात येणार असून त्यानिमित्त पणजीत भव्य मिरवणूक काढून कामगारांच्या विविध प्रश्नांसंबंधी जागृती करण्यात येणार आहे. आयटक आणि त्यांच्या अन्य सर्व संलग्नित संघटनांतर्फे या मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे.
रविवारी सकाळी 9.30 वाजता पणजीतील कदंब बसस्थानकाजवळून मिरवणूक प्रारंभ होणार आहे. तेथून ही मिरवणूक चर्च चौकापर्यंत येणार असून मनपाच्या ग्रासिया गार्डनजवळ जाहीर सभेत रुपांतर होणार आहे.
या सभेत देशातील वाढती महागाई, पेट्रोल-गॅस आदी इंधनांची दरवाढ, वाढती बेरोजगारी, सरकारकडून कामगार कायद्याची चाललेली थट्टा, यासारख्या विषयांवरही या सभेत आवाज उठविण्यात येणार आहे, असे फोन्सेका यांनी सांगितले. ऍड. नाईक, प्रसन्न उटगी यांनीही पत्रकार परिषदेत विचार मांडले.