सेवा पुरविणाऱ्या तिघांच्या कचाट्यात काऊंटरची खिडकी बंद
प्रतिनिधी/रत्नागिरी
रेल्वेस्थानकाच्या तिकीट काउंटरवरील गर्दी पाहता रेल्वेच्या वतीने पोस्ट ऑफिसमध्ये ट्रेन सीट बुकिंगची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. याच अनुषंगाने शहरातील गाड़ीतळ येथील पोस्ट ऑफिस येथे रेल्वे तिकीट बुकिंगसाठी काऊंटर सुरु करण्यात आले होते. मात्र हे काऊंटर गेले काही दिवस बंद अवस्थेत आहे. येणाऱ्या नागरिकांची मात्र यामुळे परवड होत आहे. हे काऊंटर पोस्टाच्या इमारतीत आहे. याला कनेक्टिविटी बीएसएनएलची आहे. तर इतर सुविधा ही रेल्वेच्या द्वारे दिली जाते.
दरम्यान, याबाबत पोस्टाच्या मुख्यालयाशी संपर्क साधला असता त्यांनी दिलेल्या माहितीनुसार हे काऊंटर गेले काही दिवस बंद होते. मात्र याबबात सुरुवातीला सर्व्हरमध्ये अडचण असावी यासाठी बेएसएनएलशी संपर्क केला तेव्हा त्यांनी सांगितले की आमची नेटवर्प कनेक्टिविटी उत्तम आहे. यानंतर रेल्वेच्या निदर्शनास ही बाब आल्यावर रेल्वेच्यावतीने अभियंता या ठिकाणी तपासणीसाठी आले होते. आता यानंतरच मुख्य समस्या स्पष्ट होणार आहे.
शहरापासून रेल्वे तिकीट प्रत्यक्ष जाऊन काढणे तसे त्रासदायकच आहे. त्यामुळे अनेक जण ऑनालाईन तिकीट काढतात मात्र त्यातही गर्दी कमी व्हावी आणि जवळच्या जवळ ही सुविधा मिळावी यासाठी नागरिकांना हा काऊंटर सोयीस्कर ठरत होता.
मागील ऑक्टोबर महिन्यात देखील काही नागरिकांनी याचा लाभ घेतला होता. असे असतानादेखील गेले काही दिवस हा काऊंटर बंद आहे. थोडक्यात रेल्वे प्रशासन पोस्ट ऑफिस आणि बीएसएनएल यांनी एकत्रितरित्या काम करणे गरजेचे आहे.