Tarun Bharat

पावसाळा संपला, प्रतीक्षा सुगीची

Advertisements

नवरात्र उत्सव आणि पाठोपाठ येणारा दीपोत्सव हे सण सृष्टीचक्राशी अगदी जोडलेले आहेत. पावसाळ्याच्या सुरुवातीला लागवड केलेली विविध पिके याच हंगामात कापणीला येतात. कोकणातील भला मोठा पावसाळा संपून सर्वसामान्य कामांसाठी 8 महिन्यांची मोकळीक याच महिन्यामध्ये सुरु होते. निसर्गाचे बदलते स्वरुप लक्षात घेता पंरपरेने आलेल्या काही परिपाठात बदल होणे अपेक्षित आहे. यातच बाजारशक्ती दिवसेंदिवस प्रभावी होत असल्यामुळे त्याचाही विचार शेतकऱयांना करावा लागत आहे.

कोकणात प्रतिवर्षी पावसाळी हंगामाच्या सुरुवातीला भाताची पेरणी करण्यात येते. पाऊस पडण्यापूर्वी 8 ते 15 दिवस अगोदर धुळवाफेची पेरणी करण्यात येते. पाण्याचा टिपूस नसताना तापत्या धुळीमध्ये भाताचे दाणे टाकले जातात. पशुपक्षांपासून संरक्षण होण्यासाठी असलेला धुळीचा थर दाण्यांना चांगलेच तापवून काढतो. पुढे पावसाची पहिली सर येताच आठवडय़ाभरात बिजातून कोंब बाहेर पडतात आणि त्यातून भाताची वाढ सुरु होते. याशिवाय गादी वाफ्यासारखे व्यापक मैदान तयार करुन त्यात भात पेरणी केली जाते. त्याला ’दाड’ म्हणतात. या शिवाय आणखी एक प्रकार म्हणजे चिखलात भातपेरणीचा आहे. अशी पेरणी करताना भाताला अगोदरच कोंब आले असतील अशी काळजी घ्यावी लागते त्याला रो पेरणी म्हणतात.

जूनच्या दुसऱया आठवडय़ापासून अखेरपर्यंत वेगवेगळ्या वेळी पाण्याची उपलब्धता लक्षात घेऊन भातपेरणी करण्यात येते. मळाशेतीमध्ये दीर्घ मुदतीने तयार होणाऱया भाताच्या म्हणजे महान वाणाची निवड करण्यात येते तर डोंगरावर होणाऱया भातशेतीसाठी लवकर होणाऱया म्हणजेच हळव्या वाणाची निवड शेतकरी करत असतात. कमी अधिक प्रमाणात अश्विन महिन्यात भाताची कापणी हाती घेण्यात येते.

याशिवाय डोंगर उतारावर कोकणात नागली व वरी ही पिके घेतली जातात. तुलनेने ती अल्प मुदतीची असतात तथापि त्यांचा वेचणी अथवा कापणी हंगाम अश्विन-कार्तिक महिन्यातच येत असतो. मोठय़ा प्रमाणात मनुष्यबळ लावून या दोन्ही पिकांचे धान्य शेतकऱयाच्या घरात येत असते. दिवाळीपूर्वी धान्य बऱयापैकी शेतकऱयांच्या कोठारात येवून पडत असते. पावसाळी हंगामात घेतलेल्या प्रचंड कष्टांना यश आल्याचे समाधान शेतकऱयाच्या मनात असते. त्याचवेळी दिवाळीचा हंगाम समोर दिसत असतो.

अलीकडच्या काळात कोकणात हापूस आंबा व काजू या पिकांची लागवड मोठय़ा प्रमाणात वाढत आहे. या लागवडीच्या सोबतच निगाही राखावी लागते. आंबा पिक उन्हाळी हंगामात येत असले तरी या पिकाची देखभाल कमी अधिक प्रमाणात वर्षभर करावी लागते. पावसाळ्यापूर्वी काही शेतकरी आंबा व काजू पिकाला खत देतात तर काहीजण पावसाळा कमी झाल्यावर खत देतात. कीटकनाशक अथवा बुरशीनाशकाची फवारणी पावसाळा हंगाम संपल्यानंतर लगेचच हाती घेण्यात येते. काही शेतकरी हापूस आंबा पिकासाठी वेगवेगळ्या संप्रेरकांचा वापर करतात. त्यामध्ये वाढ रोखणारी संप्रेरके घातल्यास आंब्याला मोहोर लवकर येतो असे संशोधन आल्याने त्याचा उपयोग काही शेतकरी करत आहेत. तथापि अशी संप्रेरके वापरताना झाडाला हानी पोहोचू नये म्हणून पुरेशा खताची मात्र देण्यात मात्र कुचराई होत असते. यामुळे हापूस आंब्याच्या झाडाला धोका पोहोचू शकतो. अशी संप्रेरके वापरल्याने आंब्याच्या नैसर्गिकपणाला बाधा येते, असे काही लोकांचे म्हणणे आहे. यामुळे अनेक शेतकरी संप्रेरकांपासून आपल्या झाडांना दूर ठेवत आहेत. संप्रेरके वापरण्याचा हंगाम हा सप्टेंबर, ऑक्टोबर महिन्यांचा असल्याचे वैज्ञानिकांनी आपल्या शिफारशींमध्ये नमूद केले आहे. परंतु अशी रसायने वापरण्याबद्दल शेतकऱयांमध्ये मोठे आकर्षण नाही. तथापि कराराने आंबा बागा घेणारे मात्र या रसायनांचा वापर करण्यात पुढाकार घेत असतात.

काजू पिकासाठी देखभालीचे काम वर्षभरच करावे लागत असते. शेतकरी मंडळी पावसाळा हंगाम संपताच झाडांना अल्पप्रमाणात लागणाऱया बुरशीनाशक आणि कीटकनाशकाबद्दल विचार करु लागतात. काही प्रमाणात अशी संरक्षक औषधे वापरण्याचा कार्यक्रम शेतकऱयांकडून करण्यात येत असतो. कृषी विद्यापीठाकडून संशोधित केलेल्या काजू जाती लवकर उत्पन्न देतात तर परंपरेने चालत आलेल्या काजूच्या जाती काहीशा उशिराने उत्पन्न देत असतात. अनेक शेतकरी मोठय़ा प्रमाणात नव्या जातींचा वापर करत असले तरी परंपरेने चालत आलेली काही झाडे आवर्जून आपल्या बागेमध्ये ठेवत असतात. जैवविविधतेला प्रोत्साहन मिळण्याचे काम विविध जातींमुळे होत असते. याशिवाय परंपरेने चालत आलेल्या काजू जातींचे काही गुणधर्म फळात उतरण्याची शक्यता वाढत असते. तशी काळजी कोकणातील शेतकरी घेत असतात.

पावसाळा हंगाम संपत असताना आता वेगवेगळी विकास कामे वेगाने सुरु होतील अशी अपेक्षा कोकणवासिय धरुन आहेत. काही कारणाने रत्नागिरी जिह्यातील राष्ट्रीय महामार्गाचे काम रखडले होते. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयानेदेखील या रखडलेपणावर प्रभावी इलाज करण्याची इच्छाशक्ती दाखवली नाही. त्यामुळे विलंबाने हे काम सुरु आहे. यापुढे पावसाळी कालावधीचे कारण रस्ता कामांकरीता देता येणार नाही अशी अपेक्षा लोक बाळगून आहेत.

वेगवेगळ्या कारणांसाठी पुढे येणारे राजकीय नेते महामार्ग काम रखडल्यास त्यावर आवाज उठवत नाहीत. याबद्दल लोक आश्चर्य व्यक्त करतात. रस्ता काम हे विकासाच्या विविध मुद्यांना पुढे नेणारे असते हे माहिती असताना त्याकडे होणारे दुर्लक्ष आश्चर्यजनक ठरते. सार्वजनिक क्षेत्रातील ढिसाळ कारभार, व्यवस्थापकांची अनिच्छा आणि जनतेची उदासिनता यामुळे महामार्गाचे काम विलंबाने होत आहे. सत्ताधारी मंडळींना देखील यातून मार्ग काढावा असे न वाटण्यामागे कोणते कारण असावे? असा प्रश्न कोकणवासियांसमोर आहे. पावसाळा संपल्यानंतर हे काम मार्गी लागेल अशी मात्र निश्चितच अपेक्षा आहे.

एकूणच पावसाळा हंगाम संपून शेतीसाठी सुगीचे दिवस तर विकासकामांसह अन्य कामकाज वेगाने होण्यासाठी मोकळा कालावधी सुरु होत आहे. यावेळी विकास कामांकरीता काही निश्चित नियोजन झाले पाहिजे. सरकारी यंत्रणेकडून कामे करुन घ्यायची असतील तर क्यापक नियोजन करावे लागते.

या नियोजनानंतर आराखडे बनतात. शेवटी प्रशासकीय व आर्थिक मंजुरीच्या आधारावर ही विकास कामे मार्गी लागतात. पावसाळ्याच्या तोंडावर साकव किंवा पुलाची मागणी करुन चालत नाही तर अशा बाबींसाठी खूप अगोदर प्रक्रिया हाती घ्यावी लागते. आता कोकणात त्याची वाटचाल सुरु होईल.

सुंकांत चक्रदेव

Related Stories

ठामपणाचे कौशल्य अंगिकारणे गरजेचे…

Patil_p

चीनपुरस्कृत नेपाळी तिढा

Patil_p

‘शरपंजरी’ खाजनशेतीला भगिरथाची प्रतीक्षा

Patil_p

पारनेरचे निमित्त!

Patil_p

कोरोना गंभीर रुग्णासाठी आशेचा किरण…

Patil_p

होईन भिकारी । पंढरीचा वारकरी ।।

Patil_p
error: Content is protected !!