उत्तर प्रदेशातील कुशीनगर येथील तीन वर्षाच्या एका मुलाच्या पोटातून उंदीर सदृश प्राणी निघत असल्याचे पाहून डॉक्टरही चक्रावून गेले आहेत. या मुलाला सध्या येथील बाबा राघवदास वैद्यकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तथापि, त्याच्यावर उपचार नेमके कोणते करावेत, याचा संभ्रम डॉक्टरांना पडला आहे. हिरा पाल असे या मुलाचे नाव आहे. पोटात दुखणे असहय़ झाल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेव्हा हा प्रकार डॉक्टरांदेखत घडला. नंतर त्याला मोठय़ा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्या पोटातून बाहेर पडलेल्या या प्राण्याचा अभ्यास आता सुरू आहे.
पोटातून उंदीर किंवा त्यासारखा प्राणी निघणे अशी घटना या रुग्णालयाच्या इतिहासात प्रथमच घडल्याचे तेथील डॉक्टर सांगतात. देशभरातही अशी घटना घडल्याची नोंद नाही. त्यामुळे रोगनिदान करणे अशक्मय झाले आहे. जंत इत्यादी कृमींचा नाश करणारी औषधे त्याला द्यावीत की नाहीत? यावरही डॉक्टरांची चर्चा सुरू आहे. या औषधांचा त्याच्यावर वाईट परिणाम झाल्यास त्याच्या जीवाला धोकाही होऊ शकतो, असे डॉक्टरांचे मत आहे. म्हणून पोटातील कृमी मारणारी प्रचलित उपचारपद्धती उपयोगात आणावी की संशोधन करून नवी औषध योजना करावी, यावर अजूनही चर्चा चालू आहे. या मुलावर अनेक प्रकारच्या पॅथॉलॉजिकल चाचण्या करण्यात येत असून लवकरच त्याच्या या अजब आजाराचे कारण शोधले जाईल, अशी आशा त्यांना वाटते.