Tarun Bharat

चाळीस बंडखोरांनी आमदारकीचा राजीनामा देऊन निवडणूक लढवावी!

मी ही राजीनामा देतो, शिवसेना युवानेते आदित्य ठाकरे यांचे खुले आव्हान

प्रतिनिधी/ रत्नागिरी

ज्या शिवसेनेने प्रेम दिले…ज्यांना विश्वास दिला…ज्यांना शिवसैनिकांनी, जनतेने डोक्यावर घेतले, तेच 40 बंडखोर पाठीत खंजीर खुपसून निघून गेलेत. पण ही बंडखोरी नुसती राजकीय नाही…सेनेशी नाही…तर माणुसकीशी झालीय. ही बंडखोरी बदलणे काळाची गरज आहे. आता 40 बंडखोरांनी आमदारकीचा राजीनामा देवून निवडणूक लढवावी. मी ही माझ्या आमदारकीचा राजीनामा देऊन निवडणूक लढवतो, असे खुले आव्हान युवासेनाप्रमुख तथा आमदार आदित्य ठाकरे यांनी शिंदे गटाच्या आमदारांना दिले.

  शिवसंवाद निष्ठा यात्रेनिमित्ताने युवानेते तथा माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे  शुक्रवारी रत्नागिरीत आले होते. त्यांच्या प्रमुख उपस्थितीत साळवी स्टॉप येथील जलतरण तलावाशेजारील मैदानावर या यात्रेनिमित्ताने त्यांनी हजारो शिवसैनिकांसमोर संवाद साधला. त्यावेळी सेनेशी बंडखोरी केलेल्या 40 आमदारांचा समाचार घेतला. स्थानिक आमदारांनी शिवसेनेशी जी बंडखोरी केली, त्यांनी योग्य की अयोग्य केलं ते विचारण्यासाठी आपण आल्याचे ठाकरे यांनी सांगितले. त्यांनी शिंदे गटाच्या आमदारांना लक्ष्य केले होते. राज्यभरात निष्ठा यात्रा सुरू झाल्यानंतर होत असलेली गर्दी पाहून निरोप यायला लागलेत. बंडखोर म्हणू नका. पण 50 खोके प्रत्येक बंडखोराच्या घरात गेलेत…स्वतःला खोके आणि महाराष्ट्राला धोके’ असे घाणेरडे राजकारण सुरू आहे. सुमारे 3 महिने झालेत, पण या डबल इंजिनच्या सरकारला एकही आपण काम केल्याचे दाखवू शकले नाहीत, अशी राज्याची स्थिती झाल्याचे ठाकरे यांनी म्हटले. हे सरकार गद्दारांचे, बेईमानांचे, घटनाबाहय़, खंजीर खुपसणारं आहे, हे सिद्ध करून दाखवतो. डबल इंजिनचे हे सरकार केंद्राच्या पाठबळावर असून कुठेही महाराष्ट्राच्या जनतेकडे त्यांचे अजिबात लक्ष नाही. यांनी ठाकरेंचे सरकार पाडले, शिवसेनाप्रमुखाच्या सुपुत्राचे सरकार पाडले, महाविकास आघाडीचे, शेतकऱयांचे कष्टकऱयांचे, महिलांचे, तरुण-तरुणींचे सरकार पाडले ते खोक्यांसाठी पाडल्याची घणाघाती टीका आदित्य ठाकरे यांनी केली.

  संवादयात्रा कार्यक्रमावेळी व्यासपीठावर खासदार विनायक राऊत, माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते, आमदार तथा शिवसेना नेते भास्कर जाधव, शिवसेना उपनेते तथा आमदार राजन साळवी, संपर्कप्रमुख सुधीर मोरे, सहसंपर्क प्रमुख राजेंद्र महाडिक, जिल्हाप्रमुख विलास चाळके, माजी जि. प. उपाध्यक्ष तथा ज्येष्ठ नेते उदय बने, माजी जि.प. अध्यक्ष विक्रांत जाधव, युवा सेनेचे पवन जाधव, मुंबईच्या माजी महापौर श्रद्धा जाधव, दुर्गा भोसले, तालुकाप्रमुख बंडय़ा साळवी, विधानसभा क्षेत्रप्रमुख प्रमोद शेरे, शहरप्रमुख प्रशांत साळुंखे, तालुका युवा अधिकारी प्रसाद सावंत यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

 सुरुवातीला यांना आघाडी नको होती म्हणून बंडखोरी केली, सांगत होते. नंतर म्हणतात आम्ही हिंदुत्वासाठी शिंदे गटातून भाजपला साथ दिली. आता सांगतात भगव्या झेंडय़ासाठी आम्ही बाहेर पडलो. याचे बाहेर पडण्याचे खरे कारण वेगळेच होते, असेही आदित्य ठाकरे यांनी सांगितले. आज महाराष्ट्रासमोर अनेक प्रश्न गंभीर आहेत. ओला दुष्काळ जाहीर करायला सरकार तयार नाही. एका बाजूला शेतकरी देशोधडीला लागला आहे. सर्वच क्षेत्रे धोक्यात आहेत. जिह्यांचा विकास ठप्प आहे. जिल्हा नियोजन समित्यांना अध्यक्ष नाही. जिह्यातील अंतर्गत कामे थांबली आहेत. निर्णय घेणार कोण, असा प्रश्न प्रशासनाला पडला आहे. काही मंत्र्यांनी अजून पदाचा कार्यभार स्वीकारलेला नाही. केवळ मंत्रीपदाचा मुकुट घालून फिरत आहेत. असे हे खोके सरकारमधील आमदार गणेशोत्सव मिरवणुकीत बंदुकीचा धाक दाखवत आहेत. अधिकाऱयांना, पोलिसांना मारहाण केली जातेय. याच बंडखोरांचा एकेकाळी आम्ही प्रचार केला होता. याच आज दुःख वाटत असल्याचेही ठाकरे यांनी सांगितले.

  यावेळी आदित्य ठाकरे यांनी उपस्थित रत्नागिरीतील शिवसैनिकांसमोर भावनिक साद घातली. ‘मी तुम्हाला भेटायला आलोय, तुम्ही कोणासोबत आहात, बंडखोर की शिवसेना हे विचारायला आलोय, तुमचे प्रेम असेच शिवसेनेवर, माझ्यावर, उद्धव ठाकरे यांच्यावर असू दे. येणाऱया निवडणुकीत बंडखोरांना धडा शिकवल्याशिवाय मी शांत बसणार नसल्याची शिवगर्जना त्यांनी येथील सभेत केली. यापूर्वी माजी केंद्रीयमंत्री अनंत गीते यांनी शिवसेनेशी बंडखोरी केलेल्या आमदारांवर तोफ डागली. खासदार विनायक राऊत यांनी तर रत्नागिरीचा पुढील आमदार शिवसेनेचाच निवडून आणणार असल्याचा निर्धार व्यक्त केला.

                   सुरक्षारक्षक दिले, पण गाडय़ा दिल्या नाहीत

रत्नागिरी जिह्याच्या दौऱयादरम्यान युवानेते आदित्य ठाकरे यांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. ठाकरे यांना झेड सुरक्षा असताना त्यांच्या सुरक्षेसाठी राज्याच्या गृहविभागाने सुरक्षारक्षक दिलेत. पण त्यांना गाडय़ा दिलेल्या नाहीत. त्या सुरक्षेवर खुद्द आदित्य ठाकरे यांनी प्रश्न केला. माझ्या सुरक्षेसाठी किती सुरक्षारक्षक द्यायचे, त्यांना गाडय़ा द्यायच्या की नाही, हा प्रश्न पूर्णपणे सरकारचा आहे. त्यांची ती जबाबदारी आहे. माझ्यासोबत शिवसैनिक आहेत. त्यांच्याच भरोशावर हा दौरा करत असल्याचा टोला आदित्य ठाकरे यांनी सरकारला लगावला.

 सभेला ठाकरेंच्या प्रेमापोटी भरपावसात शिवसैनिक चिंब

रत्नागिरीतील सभेला कोणताही मोठा बडेजाव नव्हता. सुरूवातीला सभेच्या व्यासपीठाला पँडालही उभारण्यात आला होता. पण समोर उपस्थित राहणारे शिवसैनिक हे मोकळय़ा मैदानातच उभे राहणार होते. त्यामुळे गुरुवारी सायंकाळी उशिरा उभारलेला पँडाल काढण्याचे फर्मान आदित्य ठाकरे यांच्याकडून आले. त्यामुळे व्यासपीठही पँडालविरहित उभारण्यात आले. शुक्रवारी तर सभेला ठाकरेंच्या प्रेमापोटी हजारो शिवसैनिकांची उपस्थिती होती. वातावरण सकाळपासूनच पावसाचे होते. दरम्यान सभेपूर्वी पावसाच्या सरीही कोसळल्या व त्यात उपस्थित शिवसैनिक चिंब होऊन गेले. पण त्या पावसाची तमा न बाळगता सभेतील उपस्थिती महत्त्वाची होती, हे उपस्थितांनी दाखवून दिले.

..मग त्यापेक्षा कोकणाने स्पर्धा केलीच पाहिजे

शिवसेना नेते तथा आमदार भास्कर जाधव यांनी या सभेत बंडखोर आमदारांवर व उद्योगमंत्री तथा स्थानिक आमदार उदय सामंत यांच्यावर घणाघाती आरोप करत टीका केली. आपल्यावर मागील काळात झालेल्या राजकारणाचे जणू या सभेनिमित्ताने वाभाडे काढले. अख्खा मराठवाडा शिवसेनेशी बंडखोरी करणाऱयांविरोधात पेटून उठलाय, मग आता कोकणानेही स्पर्धा करायलाच हवी. येथे तर शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. येथील सर्व आमदार, जि.प., पं.स. सर्व जागा शिवसेनेच्या निवडून आणायच्याच असल्याचे जाधव यांनी सांगितले. बंडखोरांचा समाचार लोकशाही मार्गाने घ्यायला सज्ज व्हा, असे सांगितले.  

            उद्योगमंत्र्यांनी सेनेशीच नव्हे तर महाराष्ट्राशी केली बंडखोरी

वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला हलवण्यात आला. पण राज्यातल्या या डबल इंजिनच्या सरकारला हा प्रकल्प महाराष्ट्रात थांबवता आला नाही. याच एक इंजिन बंद पडलंय, तर राज्याच्या उद्योगमंत्री उदय सामंत यांना याची माहिती नाही. आज राज्यातील एक लाख तरुण, तरुणींना नोकरी देणारा प्रकल्प गुजरातला गेला. हे राज्याचे दुर्दैव आहे. उद्योगमंत्र्यांनी केवळ शिवसेनेची बंडखोरी केली नाही. तर महाराष्ट्राशी गद्दारी केल्याचा निशाणा शिवसेना युवानेते आदित्य ठाकरे यांनी आमदार उदय सामंत यांच्यावर यावेळी साधला.

  राज्यातील महाविकास आघाडी सरकार काळात येऊ घातलेले, पाठपुरावा केलेले प्रकल्प अन्य राज्यात आताच्या सरकारमुळे गेल्याने आदित्य ठाकरे यांनी या सरकारवर टीकेची झोड उठवली. आताचे डबल इंजिनचे सरकार सत्तेवर येऊन 3 महिने झालेत. पण सत्तेवर आल्यानंतर खोके सरकारने केलेले एक काम दाखवा. उलट त्यांनी येऊ घातलेले प्रकल्प गुजरातला पाठवल्याची खंत ठाकरे यांनी व्यक्त केली. पण त्याचे खापर आमच्या महाविकास आघाडी सरकारवर फोडत आहेत. त्यांना आपल अपयश लपवायचे आहे. मात्र त्यांचा खोटेपणा उघड झाल्याचे ठाकरे यांनी स्पष्ट केले.

दांडिया फिरण्यापूर्वी मुख्यमंत्र्यांनी प्रकल्पांकडे लक्ष द्यावेः ठाकरे

आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिंदे गटातील आमदारांवर जोरदार निशाणा साधला. राज्यातून बाहेर जाणारे प्रकल्प रोखण्यासाठी सरकारने प्रयत्न करणे आवश्यक आहे. पण मुख्यमंत्री गणपतीत 250 मंडळे फिरलेत, आता पुन्हा त्यांना दांडिया, गरबासाठी फिरायचे असेल. मात्र, त्या आधी त्यांनी राज्यातील प्रकल्पांकडे लक्ष द्यावे, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली.

Related Stories

रत्नागिरी : राजापूर दळे येथे एकाच दिवशी तीन नेपाळी कामगारांचा मृत्यू

Archana Banage

रत्नागिरी : खारफुटीच्या न्यायवैद्यिक माहिती संकलनात महाराष्ट्र नंबर वन

Archana Banage

Ratnagiri : ‘टीडब्ल्यूजे’कडून गुंतवणूकदारांची आर्थिक फसवणूक

Abhijeet Khandekar

आंध्रमधून आलेल्या चौघांकडून चिपळुणात शेतकऱयांची फसवणूक!

Patil_p

रत्नागिरी जिल्ह्यात आज 13 कोरोना पॉझिटिव्ह

Archana Banage

ब्रेक फेल झाल्यामुळे बस रिव्हर्स घेताना थेट लगतच्या शेतात

Anuja Kudatarkar