नवी दिल्ली / वृत्तसंस्था
फेसबुकची मूळ कंपनी ‘मेटा’चे भारतातील प्रमुख अजित मोहन यांनी गुरुवार, 3 नोव्हेंबर रोजी राजीनामा दिला. अजित मोहन यांनी अचानक राजीनामा दिल्याने कर्मचाऱयांमध्ये खळबळ निर्माण झाली आहे. दरम्यान, ते ‘मेटा’ला राम-राम ठोकून सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘स्नॅपचॅट’मध्ये सामील होणार असल्याचे वृत्त आहे.
अजित मोहन जानेवारी 2019 मध्ये फेसबुक इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून रुजू झाले होते. त्यांनी ऑक्टोबर 2017 मध्ये पायउतार झालेल्या उमंग बेदी यांची जागा घेतली होती. ‘मेटा’पूर्वी, मोहन यांनी स्टार इंडियाच्या व्हिडिओ स्ट्रीमिंग सेवा हॉटस्टारचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून चार वर्षे काम केले होते. गेल्या चार वर्षात अजित मोहन यांनी ‘मेटा’च्या भारतातील विस्तारकार्याला आकार देण्यात आणि वाढविण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. त्यांच्या नेतृत्वाबद्दल आणि योगदानाबद्दल आम्ही कृतज्ञ आहोत आणि त्यांना भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा देतो, असे ‘मेटा’ ग्लोबल बिझनेस ग्रुपच्या उपाध्यक्षा निकोला मेंडेलसोहन यांनी स्पष्ट केले आहे.