मंगळवारच्या चर्चेत सर्व पक्षीयांचा सहभाग : विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात होणार ठराव
प्रतिनिधी /बेळगाव
महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी कर्नाटक विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात बुधवारी ठराव मांडण्यात येणार आहे. यासंबंधी मंगळवारी झालेल्या चर्चेनंतर हा निर्णय घेण्यात आला असून सर्वानुमते सीमाप्रश्नी ठराव संमत करण्याचे ठरविण्यात आले आहे.
प्रश्नोत्तराच्या तासानंतर सभाध्यक्ष विश्वेश्वर हेगडे-कागेरी यांनी चर्चेला तोंड फोडले. विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या यांनी चर्चेसाठी नोटीस दिली आहे. निजद नेत्यांनी याच मुद्द्यावर स्थगन प्रस्ताव मांडला आहे. चर्चेचा मुद्दा एकच असल्यामुळे यासंबंधी विशेष चर्चेला संधी देण्यात येईल, असे सभाध्यक्षांनी सांगितले.
त्यानंतर विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या यांनी सीमाप्रश्नी चर्चेला सुरुवात केली. भाषावार प्रांतरचना, फजल अली व महाजन आयोगाचा उल्लेख करून बेळगाव कर्नाटकाचेच आहे, हे सांगतानाच या चर्चेत हस्तक्षेप करीत माजी मंत्री एच. के. पाटील यांनी महत्त्वाच्या मुद्द्यावर चर्चा सुरू आहे. मुख्यमंत्र्यांच्या समक्ष ही चर्चा व्हावी. सभागृहात मुख्यमंत्र्यांना बोलवा, असा सल्ला दिला.
कायदा व संसदीय व्यवहारमंत्री जे. सी. माधुस्वामी यांनी मुख्यमंत्री बसवराज बोम्माई विधान परिषदेत आहेत. भोजन विरामानंतर ते येथे येतील, असे सांगितले. त्यामुळे या मुद्द्यावर भोजन विरामानंतर चर्चा करण्याचे ठरविण्यात आले. मंगळवारी विधानसभेत झालेल्या चर्चेत सर्व संमतीने दोन्ही सभागृहात ठराव मांडण्याचे ठरविण्यात आले.
सीमाप्रश्न संसदेत संपायला हवा
सीमाप्रश्नी कर्नाटकाची भूमिका स्पष्ट आहे. महाजन अहवाल हाच अंतिम आहे. एक इंचही जागा कोणाला देण्याचा प्रश्न येत नाही. दोन्ही सभागृहात ठराव मांडण्यात येईल, असे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी विधानसभेत सांगितले. सीमाप्रश्न सर्वोच्च न्यायालयात आहे. घटनेतील तरतुदीनुसार तो संसदेत संपला पाहिजे.