प्रत्येकाचे वेतन 80 लाख रुपये
जगातील एका गावाने अनेक महानगरांनाही त्याच्या श्रीमंतीने मागे टाकले आहे. या गावासमोर एखादे महानगर देखील फिके वाटू लागते. सर्वात विशेष बाब म्हणजे या गावात राहणाऱया लोकांना मिळत असलेले वेतन आहे. या गावात राहणाऱया जवळपास प्रत्येक व्यक्तीचे वेतन वर्षाकाठी 80 लाख रुपयांपेक्षा अधिक आहे.
या गावाला जगातील सर्वात श्रीमंत गाव म्हटले जाते. हे एक कृषिप्रधान गाव असून येथील लोक प्रामुख्याने शेतीच करतात. तरीही त्यांचे घर, राहणीमान पाहून मोठय़ा शहरातील लोकांना मत्सर वाटावा अशी स्थिती आहे. चीनच्या जियांगयिन शहरानजीक वसलेल्या हुआझी गावातील प्रत्येक जण श्रीमंत आहे.
शेतकऱयांचे गाव
हुआझी एक कृषिप्रधान गाव आहे, येथील लोक शेती करून स्वतःचा उदरनिर्वाह करतात. परंतु गावातील शेतकऱयांनी अवलंबिलेल्या एका कल्पनेमुळे या गावाला आता सर्वात श्रीमंत गाव म्हणून ओळखले जाते. या गावात राहणारा प्रत्येक व्यक्ती आलिशान घरात राहतो, त्यांच्याकडे महागडी वाहने आहेत.
एका कामामुळे कायापालट
1961 मध्ये हे गाव वसविण्यात आले होते, तेव्हा हे गाव अत्यंत गरीब होते आणि तेथील शेतीची अवस्था अत्यंत बिकट होती. परंतु त्यानंतर गावात कम्युनिस्ट पक्षाच्या शाखेची स्थापना झाली. या शाखेचे अध्यक्ष वू रेनवाओ यांनी गावाचे चित्रच बदलून टाकले. येथील शेतकरी स्वतःच्या जमिनीवर शेती करण्याऐवजी सामूहिक शेती करू लागला. सामूहिक शेतीमुळे येथील लोकांचे भविष्यच बदलले, आज येथील प्रत्येक जण करोडपती आहे.