वारंवार वाहतुकीची कोंडी : पाण्याचे पाईप फुटून पाणी वाया : तातडीने रस्ता पूर्ण करण्याची मागणी


प्रतिनिधी /बेळगाव
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील रस्त्याचे काम संथगतीने सुरू आहे. बऱ्याच वेळा या ठिकाणी वाहतुकीची कोंडी होत आहे. आता कित्तूर चन्नम्मा चौक ते आरटीओ सर्कल या रस्त्याला हा रस्ता जोडण्याचे काम सुरू झाले आहे. त्यामुळे सोमवारी वाहतुकीची अनेकवेळा कोंडी झाली.
जिल्हाधिकारी कार्यालय ते जुने जिल्हा पंचायत कार्यालयापर्यंत रस्ता करण्यात येत आहे. हा रस्ता टप्प्याटप्प्याने पूर्ण केला होता. मात्र, संपूर्ण रस्त्याची एकाच वेळी खोदाई करण्यात आली. काही भागात रस्ता करण्यात आला आहे. आता मुख्य रस्त्याला जोडण्यासाठी खोदाई करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच आता या रस्त्याचे काम सुरू असल्यामुळे आणखीनच वाहतुकीची कोंडी वाढताना दिसत आहे. तेव्हा तातडीने हा रस्ता पूर्ण करावा, अशी मागणी होत आहे.
जिल्हाधिकारी कार्यालय तसेच हा परिसर नेहमीच गजबजलेला असतो. जिल्हाधिकारी कार्यालयावर विविध संघटना मोर्चे काढत असतात. इतर तालुक्यांतून येणारे मोर्चेधारी चार चाकी वाहने घेऊनच कार्यालयाकडे येत असतात. त्यामुळे या ठिकाणी नेहमीच गर्दी होत असते. या रस्त्याच्या कामामुळे आणखीनच गर्दी वाढली असून बऱ्याच वेळा कोंडी होत आहे. यातच धुरळाही उडू लागला आहे. त्यामुळे या परिसरात येणाऱ्या नागरिक, कर्मचारी व अधिकाऱ्यांनाही याचा त्रास होत आहे.
पाईप फुटून पाणी वाया
या परिसरात विविध कार्यालयांना पाणीपुरवठा करण्यासाठी जमिनीतून पाईप घालण्यात आले आहेत. मात्र, जेसीबीने काम करताना हे पाईप फुटू लागले आहेत. सोमवारीही एक पाईप फुटून पाणी वाया जात होते. बऱ्याच उशिरानंतर त्या पाईपची दुरुस्ती करण्यात आली. यापूर्वीही अनेक वेळा पाईप फुटून पाणी वाया गेले आहे. त्यामुळे या रस्त्याच्या परिसरात चिखल होत आहे.