खेरसॉनच्या यशानंतर युक्रेनचे विधान
वृत्तसंस्था/ कीव्ह
खेरसॉनमधून रशियाच्या सैन्याने माघार घेतली आहे. या पार्श्वभूमीवर युक्रेनचे अध्यक्ष वोल्दोमीर झेलेंस्की यांनी देशातून रशियाच्या सैन्याला पूर्णपणे बाहेर काढण्याची प्रतिबद्धता व्यक्त केली आहे. सामरिकदृष्टय़ा महत्त्वपूर्ण खेरसॉन शहरावर रशियाच्या सैन्याने सुमारे 8 महिन्यांपूर्वी कब्जा केला होता. रशियाने आता या शहराचा ताबा गमावला आहे. 24 फेब्रुवारी रोजी रशियाने युक्रेनवर आक्रमण केले होते, तेव्हा खेरसॉनवरच रशियाने प्रथम कब्जा केला होता.
रशियाच्या सैन्याच्या माघारीनंतर खेरसॉनमधील रहिवाशांनी आनंद व्यक्त करत युक्रेनच्या सैनिकांची गळाभेट घेतली आहे. रशिया-अधिकृत क्षेत्राला मुक्त करविणाऱया युक्रेनियन सैनिकांचे असे अनेक सन्मानसोहळे होताना पाहणार आहोत. आम्ही कुणालाच विसरत नाही आणि आम्ही आमच्या प्रत्येक क्षेत्राला रशियापासून मुक्त करविणार आहोत असे म्हणत झेलेंस्की यांनी रशियाच्या कब्जातील युक्रेनच्या अनेक शहरे आणि गावांमधील लोकांना आश्वासन दिले आहे.
खेरसॉनवर नियंत्रण गमावणे रशियाच्या सैन्यासाठी मोठा झटका आहे. युक्रेनच्या सैन्याने रविवारी खेरसॉनवर स्वतःचे नियंत्रण प्रस्थापित केले आहे. अधिकाऱयांनी स्फोटक उपगरणे हटविणे आणि शहरात मूलभूत सार्वजनिक सेवा बहाल करण्यासंबंधी विचारविनिमय सुरू केला आहे. खेरसॉनच्या स्थितीला ‘एक मानवीय आपत्ती’च्या स्वरुपात वर्णिले गेले आहे. शहरातील रहिवाशांकडे वीज, पाणी, औषधे आणि अन्नाची कमतरता असल्याचे युक्रेनच्या एका अधिकाऱयाने म्हटले आहे.
8 महिन्यांच्या कब्जादरम्यान रशियाच्या सैन्याला सहकार्य करणाऱया लोकांची ओळख पटविण्यास मदत करण्याचे आवाहन युक्रेनच्या पोलिसांनी रहिवाशांना केले आहे. रशियाच्या सैनिकांनी माघार घेतल्यावर युक्रेनचे पोलीस अधिकारी शनिवारी शहरात परतले आहेत. सुमारे 200 अधिकारी शहरात काम करत असून चौक्यांची स्थापना केली जात असल्याचे युक्रेनचे राष्ट्रीय पोलीस प्रमुख इहोर क्लाइमेंको यांनी सांगितले आहे.
आम्ही जमिनीवर लढाई जिंकत असलो तरीही हे युद्ध अद्याप सुरू असल्याचे उद्गार युक्रेनचे विदेशमंत्री दिमित्रो कुलेबा यांनी कंबोडिया येथे बोलताना काढले आहेत. दक्षिणपूर्व आशियाई देशांच्या संघटनेच्या (आसियान) कंबोडियामध्ये आयोजित एका परिषदेत त्यांनी भाग घेतला आहे.