बेळगाव : शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानवतीने धर्मवीर बलिदान मास पाळण्यात आला. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या 334 व्या पुण्यतिथीनिमित्त श्रद्धांजली वाहण्यात आली. या निमित्त काढलेल्या मूक पदयात्रेत हजारो धारकरी सहभागी झाले होते. छत्रपती शिवाजी महाराज उद्यान येथे शिवमूर्तीचे पूजन जिल्हा प्रमुख किरण गावडे व पुंडलिक चव्हाण यांच्या हस्ते झाले. ही मूक पदयात्रा एसपीएम रोड, शनिमंदिर, हेमुकलानी चौक, टिळक चौक, रामलिंगखिंड गल्लीमार्गे धर्मवीर संभाजी महाराज चौकात आल्यानंतर मूर्तीला अभिषेक करण्यात आला. संभाजी महाराजांच्या प्रतिकात्मक चितेला अग्नि देण्यासाठी वढू बुद्रुक येथून ज्वाला आणली होती. पौरोहित्य छत्रे गुरुजींनी केले. य् ाावेळी विश्वनाथ पाटील, परशराम कोकितकर, अजित जाधव, पुंडलिक चव्हाण, अनंत चौगुले, किरण बडवाण्णाचे, अमोल केसरकर, अतुल केसरकर, प्रमोद चौगुले, चंद्रशेखर चौगुले, उदित रेगे, गजानन पाटील, गजानन पवार, अभिषेक निलजकर, प्रमिला पाटील, सुलोचना शिनोळकर, गौरी गवाने, मिथिला पाटील आदी उपस्थित होते.
आज राजहंसगडावर गुढीपाडवा
हिंदू नववर्षाचे स्वागत छत्रपती शिवाजी महाराजांच्या साक्षीने व्हावे या हेतूने शिवप्रतिष्ठानतर्फे ‘पहिली गुढी महाराजांसमोर’ या उपक्रमांतर्गत बुधवार दि. 22 रोजी सकाळी 10 वा. राजहंसगड येथे गुढीपाडवा साजरा केला जाणार आहे. राजहंसगड किल्ला ट्रस्ट समिती व ग्रामस्थांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार असून धारकऱ्यांनी उपस्थित राहावे.
शंभूतीर्थ असे नामकरण
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौकातील संभाजी महाराजांच्या स्मारक परिसराला श्री शंभूतीर्थ असे नामकरण शिवप्रतिष्ठानतर्फे करण्यात आले. यापुढे शिवभक्तांनी शंभूतीर्थ म्हणूनच संबोधावे, असे आवाहन किरण गावडे यांनी केले.