प्रतिनिधी/ खेड
कोकण रेल्वे मार्गावर दिवाणखवटी-विन्हेरे स्थानकादरम्यान तुटलेल्या ओव्हरहेड वायरच्या घटनेनंतर बिघडलेले वेळापत्रक रविवारीही विस्कळीतच होते. सुट्टीच्याच दिवशी कोकणकन्या एक्सप्रेससह 4 एक्सप्रेस 2 ते 3 तास विलंबानेच धावल्याने प्रवाशांना मनस्तापाला समोर जावे लागले. रेल्वेगाडय़ांचे विस्कळीत वेळापत्रक पूर्वपदावर आणण्यासाठी रेल्वे प्रशासनाचे कसोशीचे प्रयत्न सुरू आहेत.
दिवाणखवटी-विन्हेरे स्थानकानजीक ओव्हर वायर तुटल्यानंतर शुक्रवारी मध्यरात्रीपासून रेल्वेगाडय़ा उशिरानेच धावत आहेत. शनिवारीही हीच परिस्थिती कायमच राहिली होती. मुंबईहून मडगावला जाणारी कोकणकन्या एक्सप्रेस, एलटीटी-मंगळूर एक्सप्रेस, गांधीधाम एक्सप्रेस उशिराने धावल्या होत्या. या पाठोपाठ तेजस एक्सप्रेसही दुसऱया दिवशीही विलंबाने धावल्याने पर्यटकांना मनस्ताप सहन करावा लागला होता. कोकण रेल्वेकडून विस्कळीत वेळापत्रक पूर्वपदावर आणण्यासाठी कसोटीचे प्रयत्न सुरू असले तरी अजूनही वेळापत्रक बिघडलेलेच आहेत.
रविवारी मुंबईहून मडगावला जाणारी कोकणकन्या एक्सप्रेस 2 तास 13 मिनिटे उशिराने धावली. 11099 क्रमांकाची एलटीटी-मंगळूर एक्सप्रेस तब्बल साडेसहा तास विलंबाने धावली. या पाठोपाठच 12223 क्रमांकाची दुरांतो एक्सप्रेसही दीड तास उशिराने धावल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला. 16312 क्रमांकाची कोच्युवेली एक्सप्रेसही 1 तास 13 मिनिटे उशिरानेच धावली. बिघडलेल्या वेळापत्रकामुळे प्रवाशांची त्या-त्या स्थानकात होत असलेली रखडपट्टी अजूनही कायमच असल्याने हाल होत आहेत.