नियोजित आंदोलन मागे : तरुण भारतच्या वृत्ताची दखल
वार्ताहर /उसगांव
धावशिरे तिस्क उसगांव येथील सरकारी प्राथमिक शाळेत सोमवार 27 रोजी नवीन शिक्षकांची नियुक्ती केल्यामुळे पालकांनी पुकारलेले आंदोलन मागे घेत असल्याची माहिती पालक शिक्षक संघाचे अध्यक्ष उल्हास सतरकर यांनी पत्रकारांना दिली.
पहिली ते चौथीपर्यंत शिक्षण घेणाऱया 97 विद्यार्थ्यांमागे केवळ 3 शिक्षक असल्याने अतिरिक्त शिक्षण नियुक्त करण्याची पालकांची मागणी होती. बदली केलेल्या किंवा नवीन शिक्षकाची नियुक्ती दहा दिवसात न केल्यास विद्यार्थी वर्गावर बहिष्कार टाकतील व पालक फोंडा येथील भागशिक्षणाधिकारी कार्यालयावर मोर्चा नेतील असा ईशारा देण्यात आला होता. त्या संबंधीचे वृत्त दै. तरुण भारतमध्ये 24 जून रोजी प्रसिद्ध झाले होते. वृत्ताची दखल घेऊन त्वरित नवीन शिक्षकाची नियुक्ती केल्याबद्दल पालकांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, फोंडा भागशिक्षणाधिकारी उमा कुंकळकर यांना धन्यवाद दिले आहेत. तसेच दै. तरुण भारतने या समस्येवर प्रकाश टाकून समस्या सोडविण्यास मदत केल्याबद्दल खास आभार मानले आहेत.
शाळेचे वर्ग दुपारच्या सत्रात भरत असल्याने पालक व शिक्षकांना हाल सहन करावे लागतात. मुख्यमंत्र्यांनी शाळा सकाळच्या सत्रात सुरु करावी अशी मागणी पालकांनी केली आहे.