प्रतिनिधी /धारबांदोडा
सोनावळी-कुळे येथील दूधसागर धबधब्यात बुडालेल्या अर्पित शुक्ला (31, भोपाळ) या युवकाचा घटनेच्या तिसऱया दिवसानंतरही शोध लागू शकला नाही. अर्पित हा सोमवार 5 रोजी सायंकाळी धबधब्याच्या मुख्य डोहात बुडाला होता.
आत्तापर्यंत याठिकाणी अनेक जणांचा बुडून मृत्यू झाला असून मृतदेह चार ते पाच दिवसानंतरच हाती लागले आहेत. बुधवारी कुळे पोलीस स्थानकाचे उपनिरीक्षक अजय धुरी यांनी अन्य पोलीस कर्मचाऱयांसह तसेच वनखात्याच्या कर्मचाऱयांनी पूर्ण दिवस शोध मोहीम राबवली. मात्र सायंकाळी उशिरापर्यंत त्याचा कुठलाच थांगपत्ता लागू शकला नाही. कुळे पोलीस स्थानकाचे निरीक्षक संजय दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणी तपास सुरु आहे.
ओरिसाची अरेरावी चर्चेत
या घटनेमुळे गेल्या काही वर्षांपासून कुळे भागात बस्थान मांडून असला ओरिसा नामक युवक सध्या चर्चेचा विषय बनून राहिला आहे. कुळेवासिय आपले काहीच करु शकत नाहीत, अशी भाषा सध्या तो बोलत असल्याची चर्चा सुरु आहे. दूधसागर धबधब्यावर पर्यटकांना बेकायदेशीरित्या नेणाऱया या युवकाच्या कारनाम्यांची चर्चा सध्या समाजमाध्यामांवर जोरात सुरु आहे. पर्यटकांची त्याच्याकडून कशाप्रकारे लुबाडणूक चालली आहे, याचे व्हिडिओही फेसबुक व अन्य माध्यांवर पाहायला मिळत आहेत.