दिवसभराच्या शोध मोहिमेनंतरही थांगपत्ता नाही
प्रतिनिधी /धारबांदोडा
कुळे येथील दूधसागर धबधब्याच्या डोहात बुडालेल्या आर्थिक शुक्ला (31) या तरुणाचा मृतदेह मंगळवारी पूर्ण दिवस चाललेल्या शोध मोहिमेनंतरही सापडू शकलेला नाही. भोपाळ-मध्यप्रदेश येथील हा विवाहित तरुण सोमवार 5 रोजी सायंकाळी धबधब्याच्या खाली असलेल्या मुख्य डोहात बुडाला होता.
आर्थिक शुक्ला हा काही मित्रांसह सोमवारी सायंकाळी दूधसागर पर्यटनासाठी आला होता. यावेळी सोबत त्याची पत्नी व दीड वर्षांची लहान मुलगीही होती. ही घटना सायं. 6 वा. घडल्याने सोमवारी रात्री त्याचा शोध घेणे शक्य नव्हते. त्यामुळे मंगळवारी सकाळपासून शोध मोहिमेला सुरुवात करण्यात आली. अग्निशामक दल, कुळे पोलीस व नौदलाच्या पथकाने पूर्ण दिवस शोध घेऊनही त्याचा थांगपत्ता लागू शकला नाही. आमदार गणेश गावकर यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
कुळे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवारी पाच जणांचा गट पर्यटनासाठी कुळेत दाखल झाला होता. सायं. 4.30 वा. गोवा एक्सप्रेस या प्रवासी रेलगाडीने हे सर्वजण कुळेहून दूधसागर धबधब्यावर पोचले. कुळे पोलिसांच्या मते बुडालेला तरुण धबधब्याच्या मुख्य डोहाकडे गेला असता, पाय घसरून नदीत कोसळला. मात्र काही सूत्रांच्या मते आर्थिक हा दूधसागर रेल्वे पुलावरच्या कठडय़ावर बसला होता. त्यावेळी तो घसरून खाली कोसळल्याचे सांगितले जाते.
पावसाळय़ात धबधब्याजवळ धोकादायक परिस्थिती निर्माण होत असते. शिवाय पर्यटकांना घेऊन जाणाऱया गाईडने याबद्दल धोक्याची सूचना पर्यटकांना देणे आवश्यक असते. मात्र बुडालेला तरुण पुलाच्या कठडय़ावर बसण्यासाठी जात असताना त्याला धोक्याची सूचना का दिली गेली नाही ?असा सवाल उपस्थित केला जात आहे. आर्थिक शुक्ला हा पेशाने अभियंता असून तो एका बहुराष्ट्रीय कंपनीत डेटा ऑपरेटर म्हणून कामाला होता.
‘ओरिसा’मुळे कुळेची बदनामी
गेल्या काही वर्षांपासून ओरिसा नामक युवक कुळेत बस्थान मांडून आहे, जो पर्यटकांना बेकायदेशीररित्या धबधब्यावर घेऊन जात असतो. पोलीस, रेल्वे पोलीस व रेल्वे अधिकाऱयांशी संगनमत साधून तो हा अवैद व्यवसाय करीत आहे असा आरोप होत आहे. विशेष म्हणजे दूधसागर पर्यटन हंगामात जीपगाडय़ा मिळत नसल्याने जे पर्यटक माघारी फिरण्याच्या तयारीत असतात त्यांना ओरिसा हा युवक रेल्वेने धबधब्यावर घेऊन जातो. मात्र त्याच्यावर कोणतीच कारवाई होत नसल्याने स्थानिकांमध्ये नाराजी आहे. या ओरिसा नामक युवकावर कडक कारवाई करावी अशी मागणी सध्या होत आहे.