निफ्टीतही घसरणच, आयटी समभाग नुकसानीत
वृत्तसंस्था/ मुंबई
आठवडय़ाच्या पहिल्या दिवशी जागतिक बाजारांच्या सावटाखाली भारतीय शेअर बाजारही घसरणीसह बंद झाल्याचे पाहायला मिळाले. आयटी क्षेत्रातील समभाग नुकसानीत होते तर धातु, रियल्टी समभागांची खरेदी सोमवारी दिसून आली.
सोमवारी सरतेशेवटी मुंबई शेअर बाजाराचा 30 समभागांचा सेन्सेक्स निर्देशांक 482 अंकांच्या घसरणीसह 58,964.57 अंकांवर तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी निर्देशांक 109 अंकांच्या नुकसानीसह 17,674.95 अंकांवर बंद झाला. आज आयटी क्षेत्रातील समभाग मोठय़ा प्रमाणात नुकसान सोसत होते. धातू, रियल्टी आणि मीडिया कंपन्यांचे समभाग तेजीत होते. सेन्सेक्स सकाळी 114 अंकांच्या घटीसह 59,333 अंकांवर सकाळी खुला झाला होता तर निफ्टी 44 अंकांच्या नुकसानीसह 17,740 अंकांवर खुला झाला होता. बीएसईवर मिडकॅप व स्मॉल कॅप निर्देशांक तेजीत होता. यात जेएसडब्ल्यू एनर्जी, ओबेराय रियल्टी, टाटा पॉवर, अदानी पॉवर यांचे समभाग तेजी राखून होते. युनियन बँक, बजाज होल्डिंग्ज, एसआरएफ, यस बँक आणि माइंड ट्री यांचे समभाग घसरलेले दिसले.
युपीएससी, सीए, बँकिंग क्षेत्रासह सरकारी परीक्षांसंबंधी ऑनलाइन-ऑफलाइन कोचिंग घेणाऱया वेरांदा लर्निंग सोल्युशन्स यांच्या समभागांनी शेअर बाजारात नव्याने प्रवेश करत सोमवारी दमदार एंट्री मिळवली. कंपनीचा समभाग बीएसईवर 14.5 टक्के प्रिमीयमसह 157 रुपयांवर लिस्ट झाला आणि 20 टक्के वाढीसह तो 165 रुपयांवर पोहचला. निफ्टीतील 11 क्षेत्रांपैकी 3 क्षेत्रे तेजीसोबत बंद झाली. आयटी निर्देशांक हा सर्वाधिक 1.41 टक्के इतका घसरणीत होता.
कच्च्या तेलाच्या किंमतीत घसरण राहिल्याने रुपया अमेरिकन डॉलरच्या तुलनेत 14 पैसे वाढून 75.79 रुपयांवर पोहचला होता. दुसरीकडे अमेरिकेतील बाजार सोमवारी नकारात्मकच कल दर्शवत होता. युरोपातले बाजारातही नरमाईचा सूर होता. आशियाई बाजारात निक्की 164 अंकांनी, हँगसेंग 663 अंकांनी तर कोस्पी 7 अंकांनी व शांघाई कम्पोझीट 4 अंकांनी घसरलेला होता.