17 रोजी मुख्यमंत्री बोम्माई मांडणार राज्याचा अर्थसंकल्प
प्रतिनिधी/ बेंगळूर
राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनाला 10 फेब्रुवारीपासून प्रारंभ होणार असून 17 फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्री बसवराज बोम्माई राज्याचा अर्थसंकल्प मांडणार आहेत. शुक्रवारी बेंगळूरमध्ये पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हो निर्णय घेण्यात आला आहे. राज्यपाल थावरचंद गेहलोत विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांना उद्देशून अभिभाषण करतील. कायदा आणि संसदीय कामकाजमंत्री जे. सी. माधुस्वामी यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
निवडणुकीचे वर्ष असल्याने यावेळी विधिमंडळाचे संयुक्त अधिवेशन आणि अर्थसंकल्पीय अधिवेशन एकाच वेळी घेण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. 10 फेब्रुवारी रोजी संयुक्त अधिवेशनाला प्रारंभ होईल. मुख्यमंत्री बोम्माई हे 17 फेब्रुवारी रोजी अर्थसंकल्प मांडतील. अधिवेशन किती दिवस घ्यावे, याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.
अर्थसंकल्पपूर्व बैठकांना 23 पासून प्रारंभ
मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी 17 फेब्रुवारी रोजी राज्याचे अर्थसंकल्प मांडण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर ते 23 जानेवारीपासून अर्थसंकल्पपूर्व बैठकांना प्रारंभ करणार आहेत. अर्थसंकल्प मांडण्याआधी मुख्यमंत्र्यांकडून विविध खात्यांच्या मागण्यांविषयी संबंधीत खात्याचे मंत्री आणि अधिकाऱ्यांची बैठक घेण्याची पद्धत आहे. त्यानुसार बुधवारपासून बसवराज बोम्माई बैठका सुरु करतील.
सरकारच्या विविध 30 हून अधिक खात्यांचे मंत्री आणि अधिकाऱ्यांसमवेत 23, 24 आणि 25 जानेवारी असे तीन दिवस अर्थसंकल्पासंबंधी चर्चा करतील. या बैठकानंतर मुख्यमंत्री बोम्माई शेतकरी संघटना, दलित संघटना, कन्नड संघटना तसेच विविध संघटनांच्या प्रतिनिधींशी देखील बैठक घेऊन चर्चा करणार आहेत.