अंबाबाई मंदिरातील सांडपाण्याच्या गटारीचा ताकतुंबा, ‘विधी व न्याय’चा गटारासाठी देवस्थानला निधी देण्यास नकार, मंदिराबाहेर गटार करण्याची जबाबदारी मनपाचीच-विधी व न्याय विभाग
कोल्हापूर /संग्राम काटकर
अंबाबाई मंदिराच्या पूर्व दरवाजा खालून मंदिरात आलेल्या सांडपाण्याचे गटार फक्त बाहेरील बाजूला वळवायचे आहे. दर्शनास येणाऱया भाविकांना सांडण्याचा त्रास होऊ नये गटार बाहेरून वळवून घेण्यामागची पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीची भावना आहे. पण हे गटाराचे काम कोणी करायचे याचाच ताकतुंबा गेली वर्षभर सुरु आहे. गटार मंदिराबाहेरुन वळवण्याचे काम महापालिकेने करावे, असे देवस्थान समितीने प्रशासनाला सांगितले होते. पण निधी नसल्याचे सांगत प्रशासनाने गटार कामातून अंग काढून घेतले. त्यामुळे देवस्थान समितीने गटार कामासाठी पुढाकार घेतला. मात्र महापालिका जागेत समिती गटारकाम करु शकत नसल्याचे सांगत शासनाच्या विधी व न्याय विभागाने निधी देण्यास नकार दिला आहे. तेव्हापासून आजतागायत गटाराचा प्रश्न तुंबून राहिला आहे.
दोन वर्षापूर्वी देवस्थान समितीचे माजी अध्यक्ष महेश जाधव यांनी अंबाबाई मंदिराच्या घाटी दरवाजाजवळच्या भागातील बुजलेला मणिकर्णिका कुंड खुला केला. त्याच्यासोबत कुंडाचे मुळेच सौंदर्यही उजेडात आले. मात्र याचवेळी अंबाबाई मंदिराच्या पूर्व दरवाजाखालून सरलष्कर भवनच्या दिशेने मंदिरात आलेल्या गटाराचे सांडपाणी थेट कुंडात मिसळू लागले. शिवाय पावसाळ्यात सतत ओव्हरफ्लो होणाऱया या गटारीचे पाणी सतत नजिकच्या दत्त मंदिर, भरत मंदिरापर्यंत जाऊ लागले. त्यामुळे मंदिरात दुर्गंधीही सुटू लागली. त्यामुळे मंदिराच्या पावित्र्याला धक्का पोहचू लागला. ही माहिती जेव्हा समस्त हिंदुत्ववादी संघटनांना कळली तेव्हा त्यांनी थेट देवस्थान समितीसह जिल्हा प्रशासनाकडे जाऊन मंदिरातील गटात बाहेरून वळवून घेण्यासंदर्भातील सूचना महापालिकेला द्याव्यात अशी विनंती केली. मंदिराच्या पावित्र्याला सांडपाणीने धक्का लागावा हे सहन करण्यापलिकडे आहे, असेही प्रशासनाला सांगितले होते. देवस्थान समितीनेही गटारीतील पाण्याचा बंदोबस्त करण्यासाठी महापालिका प्रशासनाला सांगितले होते.
मंदिराच्या पूर्व दरवाजाजवळून संबंधीत गटार संत गाडगेबाबा पुतळा मार्गे जोतिबा रोडवरील जोतिबा मंदिराच्या पिछाडीस असलेल्या चेंबर जोडण्याचेही ठरले. त्यानुसार महापालिका प्रशासनाच्या यंत्रणेने गटार बांधणीसाठी मंदिराच्या पूर्व दरवाजापासून ते जोतिबा रोडवरील जोतिबा मंदिरापर्यंतची मापेही घेतली. मात्र काहीच दिवसांनी निधी नसल्याचे कारण सांगत प्रशासनाने गटार काम करु शकत नसल्याचे देवस्थान समितीला सांगितले. त्यामुळे देवस्थान समितीने पुढाकार घेऊन गटार काम करण्याचे ठरवले. त्यानुसार गटार बांधणीसाठी 2 कोटी 60 लाख रुपये निधी अपेक्षित असल्याचा प्रस्ताव तयार करुन तो शासनाच्या विधी व न्याय विभागाकडे पाठवला. मात्र मंदिराची पुर्व दरवाजाबाहेरील जागा ही महापालिकेची असून त्यामध्ये समितीला गटारकाम करता येणार नाही. त्यामुळे कामासाठी आम्ही निधी ही देऊ शकत नाही, असे सांगितले. तेव्हापासून हा गटार बांधकामाचा प्रश्न तुंबून राहिला आहे, तो आजही कायम आहे.
महापालिकेने रस्त्याची जागा भाडेतत्वावर द्यावी..
गटार कामासाठी महापालिकेकडे निधी नसेल तर अंबाबाई मंदिराच्या पूर्व दरवाजा ते संत गाडगेबाबा पुतळा ते जोतिबा रोडवरील जोतिबा मंदिर पिछाडीपर्यंतच्या रस्त्याची जागा महापालिकेने देवस्थान समितीला भाडेतत्वावर द्यावी. जेणे करुन समितीला मंदिरातील गटार बाहेरून वळवून घेण्याचे काम सहजरित्या करता येईल. शिवाय महापालिकेने जागा दिल्यास विधी व न्याय विभागाकडून गटार कामासाठी आवश्कतो निधी ही मिळता येईल.
शिवराज नाईकवाडे (सचिव:देवस्थान समिती)