समाजमाध्यमांवर छायाचित्रे व्हायरल झाल्यानंतर पालिकेकडून कृती, मात्र प्राधिकरणाने द्यायच्या कोटीभराच्या थकबाकीसंदर्भातील चित्र अस्पष्ट
प्रतिनिधी /मडगाव
मडगावच्या एसजीपीडीए मार्केटमध्ये मोठय़ा प्रमाणातील कचरा भिजत पडला होता. कचरा उचल करण्याच्या शुल्कापोटी प्राधिकरणाने पालिकेला सुमारे 1.12 कोटींची थकबाकी फेडणे बाकी आहे. त्यामुळे पालिका मंडळाने कचरा उचलणे बंद केल्याचे सांगण्यात येत होते. मात्र समाजमाध्यमांवर सकाळी सदर कचरा पडून असल्याची छायाचित्रे व्हायरल झाल्यानंतर तो सायंकाळी हटविण्यात आला. सदर कचरा हटविताना प्राधिकरणाने पालिकेला थकबाकी काही प्रमाणात भरली आहे काय अथवा भरण्याचे आश्वासन दिल्यानंतर तो उचलण्यात आला काय यासंदर्भात पालिकेचे अधिकारी व नगराध्यक्ष लिंडन पेरेरा यांच्याकडून समाधानकारक उत्तर मिळू शकले नाही.
एसजीपीडीए मार्केट परिसरात पडून असलेल्या कचऱयासाठी पालिका नाही, तर एसजीपीडीए जबाबदार आहे. दक्षिण गावा नियोजन व विकास प्राधिकरण ही स्वतंत्र संस्था आहे आणि एसजीपीडीए मार्केटमध्ये निर्माण होणारा कचरा साफ करण्याचे कर्तव्य त्यांचे आहे, अशा प्रतिक्रिया समाजमाध्यमांवर उमटू लागल्या होत्या. एसजीपीडीएचा पालिकेसोबत कचरा उचलण्याचा करार आहे. परंतु अनेक वर्षांपासून प्राधिकरणाकडून पालिकेला थकबाकी प्रलंबित आहे. प्राधिकरणाला वारंवार स्मरण करून दिल्यानंतरही पालिकेची 1.12 कोटींची बिले प्रलंबित आहेत. पालिकेच्या अधिकाऱयांनी बिले मोकळी करण्याच्या स्पष्ट सूचना वेळोवेळी केल्या होत्या. अन्यथा कचरा गोळा करणे थांबवावे लागेल असे प्राधिकरणाला स्पष्ट करण्यात आले होते.
पालिकेच्या मागील बैठकीत प्राधिकरणाच्या कचरा उचल प्रलंबित बिलाच्या प्रश्नावर चर्चा झाली होती. यावेळी 1.12 कोटींची बिले फेडणे बाकी असल्याचे नजरेस आले होते. प्राधिकरणाने ही थकबाकी देण्याचे मान्य केले आहे काय आणि त्यानंतरच एसजीपीडीए मार्केटच्या आवारात पडून राहिलेला कचरा मंगळवारी उचलण्यात आला काय, अशी विचारणा शॅडो कौन्सिलचे निमंत्रक सावियो कुतिन्हो यांनी केली आहे.
एसजीपीडीएकडून प्रकल्पाच्या जागेसाठी निधीची मागणी
दरम्यान, मडगाव पालिका मंडळाने आठवडाभरापूर्वी झालेल्या बैठकीत एसजीपीडीएची आधीची थकबाकी जी कोटीच्या घरात पोहोचली आहे ती फेडण्यास यापुढे टाळाटाळ झाल्यास प्राधिकरणाच्या मार्केटमधील कचरा उचलणे थांबवावे असे स्पष्ट केले होते. त्यानंतर लगेच पालिकेचे मुख्याधिकारी रोहित कदम यांनी प्राधिकरणाच्या सदस्य सचिवांशी चर्चा केली होती, अशी माहिती पालिकेच्या सूत्रांनी दिली. यावेळी सदस्य सचिवांनी पालिकेने एसजीपीडीएच्या मार्केटमध्ये 5 टन क्षमतेचा जो बायोमिथेनेशन प्रकल्प उभारला आहे त्याला जागा उपलब्ध केल्याने पालिकेला निधी फेडावा लागेल असे स्पष्ट केल्याचे सांगण्यात आले आहे. अशा प्रकारचा कोणताही करार झालेला असल्यास व पालिका प्राधिकरणाला रक्कम देय असल्यास त्याचा भरणा करण्यात येईल. मात्र यासंदर्भात लेखी कळविण्यास प्राधिकरणाच्या सदस्य सचिवांना सांगितले आहे, अशी माहिती पालिका सूत्रांनी दिली.