ऑनलाईन टीम/तरुण भारत
निवडणूक आयोगाने धनुष्यबाण चिन्ह गोठवल्यांनतर ठाकरे आणि शिंदे गटाला मोठा धक्का बसला होता. त्याचबरोबर दोन्ही गटाला शिवसेना हे नावही वापरता येणार नसल्याचे म्हंटले होते. त्यामुळे शिंदे गट आणि ठाकरे गट यांनी चिन्ह आणि नावं निवडणूक आयोगाला पाठवली होती. यांनतर आज निवडणूक आयोगाकडून एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना ‘बाळासाहेब शिवसेना’ हे नाव मिळालं आहे. तर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटाला मशाल हे चिन्ह आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव मिळालं आहे. तर शिंदे गटाला उद्या सकाळी १० वाजेपर्यंत तीन चिन्हे पुन्हा सूचवावी असा पर्याय दिला आहे.
विशेष म्हणजे केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेचे धनुष्यबाण हे चिन्ह गोठवण्याचा निर्णय घेत शिवसेना हे नाव वापरण्यावर तात्पुरती बंदी घातली होती. यानंतर अंधेरी पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाने त्रिशूळ, उगवता सूर्य आणि मशाल या तीन चिन्हांचा पर्याय निवडणूक आयोगाकडे पाठवला होता. तर शिंदे गटाने आज त्रिशूळ, गदा आणि उगवता सूर्य ही चिन्ह निवडणूक आयोगाकडे पाठवली होती. मात्र निवडणूक आयोगाने आता ‘त्रिशूळ’ आणि ‘गदा’ चिन्ह बाद करत दोन्ही गटाला पुन्हा मोठा धक्का दिला आहे. धार्मिक चिन्ह असल्याचे म्हणत आयोगानं ही दोन्ही चिन्ह नाकारली आहेत.
हे ही वाचा : भाजपाने विरोधी पक्ष बनण्याची तयारी करावी; थरूर यांचे थेट आव्हान
यानंतर निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे गटाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव देत ‘मशाल’ हे चिन्ह बहाल केले आहेत. तर शिंदे गटाला चिन्हासाठी तीन पर्याय देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यात शिंदे गटाला नावांच्या तीन पर्यायांपैकी ‘बाळासाहेबांची शिवसेना’ हे नाव वापरण्यास निवडणूक आयोगाने परवानगी दिली आहे तर ठाकरे गटाला ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे’ हे नाव वापरण्यास परवानगी दिली आहे.