Tarun Bharat

Kolhapur : जिल्ह्याच्या राजकारणात शिंदे गटच केंद्रबिंदू

दोन्ही काँग्रेससह भाजपचीही गरज; शिंदे गटाची सावध भूमीका; नव्या समीकरणांची नांदी

संतोष पाटील कोल्हापूर

राज्यातील सत्तानाटय़ानंतर कोल्हापुरातील दोन खासदार आणि एका आमदारांसह दोन माजी आमदार शिंदे गटात गेले. मात्र दोन्ही काँग्रेसचे जिह्यातील नेते खा. संजय मंडलिक आपलेच आहेत, असे अनेकवेळा जाहीर करुनही शिंदे गटाकडून मात्र कसलीही प्रतिक्रिया येत नाही. संस्थात्मक राजकारणासह भाजपला रोखण्यासाठी दोन्ही काँग्रेसची शिंदे गट ही नुसती गरज नाही तर अपरिहार्यता असल्याचे चित्र आहे.

राज्यात महाविकास आघाडीचा जन्म होण्यापूर्वी कोल्हापुरात पाच वर्षापूर्वी दोन्ही काँग्रेस आणि शिवसेना एकत्र आली. शिवसेनेच्या विभाजनाने महाविकास आघाडीला पायउतार व्हावे लागले. पहिल्या टप्प्यात आ. प्रकाश आबिटकर आणि राजेश क्षीरसागर शिंदे गोटात सामील झाले. त्यानंतर खा. मंडलिक आणि खा. धैर्यशील माने सहभागी झाले. माजी आमदार सत्यजित पाटील सरुडकर, डॉ. सुजित मिणचेकर आणि उल्हास पाटील हे शिवसेनेसोबत आहेत. चंद्रदीप नरके यांनी अध्याप उघड भूमीका घेतलेली नाही. गोकुळ, जिल्हा बँक, राजाराम कारखाना, कृषी उत्पन्न बाजार समिती, महापालिका आणि जिल्हा परिषद या महत्वाच्या संस्थातील राजकारण आणि निवडणुकांसाठी शिंदे गटाची ताकद दोन्ही काँग्रेससाठी महत्वाची मानली जाते. शिवसेनेत यापूर्वी जे दोन गट होते तेच आता शिंदे गटात अस्पष्टपणे आहेत. अध्याप जाहीरपणे दोन गटातील वाद चव्हाटय़ावर आला नसला, तरी धुसफूस सुरू झाली आहे. शिंदे गटाने नव्याने नेमलेले पदाधिकाऱयांच्या नावावरुन आता चर्चेचे धुमारे सुरू झाले आहेत.

आ. सतेज पाटील, आ. हसन मुश्रीफ, आ. पी. एन. पाटील, माजी आमदार मालोजीराजे यांच्यासह काँग्रेस-राष्ट्रवादीची फळी एका बाजूला आहे. तर दुसऱया बाजूला भाजपचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांत पाटील, खा. धनंजय महाडिक यांच्यासह भाजप आणि शिंदे गटाचे शिलेदार अशी दोन गटात विभागणी आहे. जिह्यातील राजकारण भाजपच्या साथीने किंवा त्यांच्या व्यासपीठावरुन होईल हे अध्यापही खा. मंडलिक आणि खा. माने या दोन्ही खासदारांनी स्पष्ट केलेले नाही. बंडखोरी केलेल्यांना टोकाचा विरोध करत काँग्रेस-राष्ट्रवादीला पाठींबा किंवा गरज पडल्यास एकला चलो, अशी राजकीय वाटचाल ठाकरे यांच्या शिवसेनेची आहे. बंडाळी हा शिवसेनेचा अंतर्गत प्रश्न असल्याचे जिह्यातील दोन्ही काँग्रेसचे नेते सांगत आहेत. तर दुसऱया बाजूला शिंदे गट पर्यायाने खा. संजय मंडलिक आमचेच आहेत. संस्थात्मक आणि पक्षीय राजकारण वेगळे असल्याचा निर्वाळा देत संस्थांतील राजकारणाला धक्का लागू नये याची दक्षताही घेत आहेत. निवडणुका कधीही होवोत, आपल्या मतपेटीला आणि संस्थात्मक राजकारणाला कुठेही धक्का लागू नये, याची सर्वस्वी काळजी घेतली जात आहे.

राजकारण कूस बदलू शकते

भविष्यात अजूनही राजकारण ढवळून निघेल. काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप, शिवसेना, जनुसराज्य पक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि नव्याने निर्माण झालेला शिंदे गट अशी वरवर विभागणी असली तरी संस्थात्मक राजकारणाचे पैलू असल्याने सोयीनुसार हातमिळवणीचा डाव रंगणार आहे. तालुक्याच्या राजकारणात विरोधात मात्र संस्थात्मक निवडणुकांत व्यासपीठावर हे सोयीचे राजकारण दिसत आहे. टोकाचे राजकीय संघर्ष असलेल्या नेत्यांची एकी होईल ? आजचे मित्र कदाचित एकमेकाविरोधात उभेही ठाकतील? राजकारणात काहीही अशक्य नाही, त्यामुळे कोल्हापूरकरही बारकाईने नेत्यांच्या कृती आणि व्यक्तव्याकडे पहात आहेत.

राजकारणात अजूनही व्टिस्ट

खा. संजय मंडलिक यांनी शिंदे गटात जाण्यापूर्वी आ. सतेज पाटील आणि आ. हसन मुश्रीफ यांच्यासोबत चर्चा केल्याचे सांगितले जाते. मंडलिक यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर गोकुळमधील सत्तांतर आणि जिल्हा बँकेचे राजकारण वादळी होण्याची चर्चा रंगली. संस्था आणि तालुक्यातील राजकारणात असलेली एकमेकातील अडक पाहता, पाटील आणि मुश्रीफ यांनी अनेकवेळा मंडलिक आमचेचं असल्याचेच ठासून सांगितले. यावर शिंदे गट अथवा खा. मंडलिक यांच्याकडून खंडनही झालेले नाही किंव समर्थनही केलेले नाही. जिह्याच्या राजकारणात अजूनही व्टिस्ट असल्याचेच हे संकेत आहेत.

Related Stories

सोमवारपासून सरसकट दुकाने उघडणारच

Archana Banage

केडीसीसीच्या निवडणुकीत विरोधकांची मोट!

Archana Banage

कोल्हापूरची कोरोना स्थिती गंभीर

Archana Banage

पर्यटनामुळे माणूस अधिक समृद्ध होतो

Abhijeet Khandekar

जिल्ह्यात केंद्रीय योजनांची अधिक प्रभावीपणे अंमलबजावणी करावी- मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया

Abhijeet Khandekar

पाच वर्षांपूर्वी आजीला भिंतीत पुरले; आरोपी नातवाला कोल्हापुरात अटक

Archana Banage