केंद्रीय निवडणूक आयोगाचा अस्थायी निर्णय, शिंदे गट आणि ठाकरे गट यांना नवी चिन्हे सोमवारी देणार
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
‘धनुष्यबाण’ हे निवडणूक चिन्ह कोणाला मिळणार, हा प्रश्न केंद्रीय निवडणूक आयोगाने तात्पुरता सोडविला आहे. शिवसेनेचे हे पारंपरिक चिन्ह आता गोठविण्यात आले आहे. तसेच ‘शिवसेना’ हे नावही तात्पुरते गोठविण्यात आले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री शिंदे आणि ठाकरे या दोन्ही गटांना ते वापरता येणार नाही. शनिवारी रात्री उशिरा हा निर्णय घेण्यात आला. निवडणूक आयोगाच्या या निर्णयाने ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे.
जूनच्या अखेरीस शिवसेनेमध्ये दोन गट स्थापन झाल्यानंतर दोन्ही गटांपैकी कोणत्या गटाचे शिवसेनेवर वर्चस्व असेल, हा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात पोहचला होता. तसाच तो निवडणूक आयोगाच्या दारातही पोहचला होता. सर्वोच्च न्यायालयाने काही दिवसांपूर्वी हा प्रश्न निवडणूक आयोगानेच सोडवावा, असा स्पष्ट निर्णय दिल्याने आता निवडणूक आयोगच सुनावणी करणार आहे.
दोन्ही गटांचे म्हणणे सादर
शिंदे गटाने निवडणूक आयोगाकडे आपले म्हणणे काही दिवसांपूर्वीच मांडले होते. आयोगाने ठाकरे गटाला त्याचे म्हणणे सादर करण्यासाठी शनिवारी दुपारी 2 वाजेपर्यंतची वेळ दिली आली होती. ठाकरे गटाने आपले 800 पानांचे प्रतिज्ञापत्र सादर केले. शिंदे गट आणि ठाकरे गट या दोहोंचे म्हणणे विचारात घेऊन आयोगाने आपला निर्णय तात्पुरत्या स्वरुपात घोषित केला आहे.
शिंदे गटाची कागदपत्रेही सादर
शिंदे गटाने आपले म्हणणे आयोगासमोर लेखी स्वरुपात आणि प्रतिज्ञपत्रांच्या आधारे यापूर्वीच सादर केले आहे. आपल्या गटाला शिवसेनेच्या किती जणांचा पाठिंबा आहे याची माहितीही कागदपत्रांसहित या गटाने सादर केली आहे. ठाकरे गटानेही त्याची माहिती सादर करावी अशी सूचना करणारा ईमेल आयोगाने या गटाला पाठविला होता. त्यानुसार ही माहिती सादर करण्यात आल्याचे ठाकरे गटाचे म्हणणे आहे.
अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीचा प्रश्न
येत्या 3 नोव्हेंबरला मुंबईतील अंधेरी पूर्व मतदारसंघात विधानसभेची पोटनिवडणूक होत आहे. शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांचे निधन झाल्याने ही पोटनिवडणूक होत आहे. लटके यांचे निधन शिवसेनेचे दोन गट होण्यापूर्वी झाले होते. आता या मतदारसंघात दोन्ही गटाचे उमेदवार उभे राहण्याची शक्यता आहे. अशावेळी चिन्ह कोणाला देणार हा प्रश्न आयोगासमोर होता. आता त्यावर पडदा पडला आहे. धनुष्यबाण हे चिन्ह अंधेरी पूर्व मतदारसंघातील पोटनिवडणूक होईपर्यंत गोठविण्यात आले आहे, असे आयोगाने घोषित केले…..
नवे चिन्ह सोमवारी
निवडणूक आयोग आता शिंदे गट आणि ठाकरे गट या दोन्ही गटांना नवे चिन्ह देणार आहे. ते कोणते असेल हे सोमवारीच स्पष्ट होईल. सर्वसाधारण प्रथेनुसार प्रत्येक गटाला तीन चिन्हे सुचविली जातील. त्यापैकी एक चिन्ह त्या गटाला निवडावे लागेल. शिंदे गटाला तलवार हे चिन्ह हवे असून ठाकरे गटाला गदा हे चिन्ह हवे आहे. मात्र, अंतिम अधिकार केंद्रीय निवडणूक आयोगाचाच आहे.
परिणाम कोणावर अधिक ?
निवडणूक आयोगाच्या या निर्णयाचा नकारात्मक परिणाम ठाकरे गटावरच अधिक होण्याची शक्यता तज्ञांनी व्यक्त केली आहे. कारण शिंदे गट हा नवाच असून त्याला स्वतःचे चिन्ह आणि नाव अद्याप नाही. ठाकरे गट मात्र पूर्वापारपासून धनुष्यबाण या चिन्हावर निवडणुकीत उतरत आला आहे. धनुष्यबाण या चिन्हापेक्षाही ‘शिवसेना’ हे नाव गोठविल्याचा फटका ठाकरे गटाला अधिक बसेल अशीही चर्चा आहे. त्यामुळे आता दोन्ही गटांना नवे चिन्ह मिळणार असून ठाकरे गटाला नव्याने प्रारंभ करावा लागणार, असे तज्ञांचे मत आहे. सोमवारी नवी चिन्हे देण्यात आल्यानंतर चिक्ष स्पष्ट होणार आहे.
..केंद्रीय निवडणूक आयोगाचा महत्वाचा निर्णय
ड नाव आणि चिन्ह गोठविण्याचा निर्णय अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीपुरताच
ड अंतिम निर्णय निवडणूक आयोग दोन्ही गटांच्या सुनावणीनंतरच घेणार
ड शिवसेना हे नाव गोठविण्याचा निर्णय ठाकरे गटाला अधिक त्रासदायक
ड अंधेरी पूर्व पोटनिवडणुवर याचा काय परिणाम होणार यावर रंगली चर्चा