पुणे / प्रतिनिधी :
फुले-शाहू-आंबेडकर चळवळीतील कार्यकर्त्या तसेच प्रसिद्ध वक्त्या सुषमा अंधारे यांनी हाती शिवबंधन बांधल्यामुळे शिवसेनेला आता आक्रमक व पुरोगामी चेहरा प्राप्त झाला आहे. अंधारे यांच्याकडे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महत्त्वाची म्हणजेच पक्षाच्या उपनेतेपदाची जबाबदारी सोपविल्याने ही तोफ आता पुण्यामुंबईसह राज्यभर धडधडण्यासाठी सज्ज झाली आहे. मुख्य म्हणजे या माध्यमातून शिवशक्ती-भीमशक्तीचा प्रयोग यशस्वीपुणे पुढे नेण्याची रणनीतीही आखण्यात आल्याचे बोलले जात आहे.
सुषमा अंधारे या 2019 च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या स्टार प्रचारक होत्या. विधानसभा निवडणुकीत त्यांनी राष्ट्रवादीचा जोमाने प्रचार केला होता. आता त्या शिवसेनेत दाखल झाल्याने सेनेला एक आक्रमक चेहरा मिळाला आहे. आंबेडकरी चळवळीतील जनमानसावर पकड असणाऱया कार्यकर्त्या असाही अंधारे यांचा लौकिक आहे. त्यांच्या पक्षप्रवेशामुळे शिवशक्ती-भीमशक्ती एकजुटीचा आवाजही आता बुलंद होण्याची चिन्हे आहेत.
आता पुरोगामी मते जोडण्याचाही प्रयत्न
अंधारे या कोरेगाव भीमा प्रकरणात तक्रारदार होत्या. त्यांनी वेगवेगळय़ा मंचावरून सातत्याने पुरोगामी भूमिकांचा आक्रमकपणे पुरस्कार केला आहे. हे पाहता त्यांच्या पक्षप्रवेशाने पुरोगामी मतेही आपल्याकडे वळविण्याचा सेनेचा प्रयत्न असल्याचे मानले जात आहे. उद्धव ठाकरे यांचे आजोबा प्रबोधनकार ठाकरे हे महाराष्ट्रातील सुधारणावादी विचारवंतांपैकी एक ओळखले जातात. हा दाखलाही यानिमित्ताने दिला जात असल्याचे दिसत आहे.
भावाला संकटातून बाहेर काढणार : सुषमा अंधारे
दरम्यान, भाऊ संकटात असल्याने बहीण या नात्याने मी पक्षात आली आहे. माझ्या डोक्यावर ईडीच्या फाईलचे ओझे नाही किंवा अमित शहा यांनी कोणतेही प्रलोभन दिलेले नाही. मी आतापर्यंत भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांची लेक म्हणून लौकिक मिळवला आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक शिसैनिकाच्या घरातील बहीण वा लेक होण्याचा मी प्रयत्न करेन. हीच जागा सर्वांत मोठी आहे, असे मला वाटत आहे. नीलम गोऱहे माझ्यासाठी कायम आदर्श राहिलेल्या आहेत. त्या माझ्यासाठी आईसारख्या आहेत, अशा भावना सुषमा अंधारे यांनी व्यक्त केल्या आहेत.
ठाकरेंकडून महत्त्वाची जबाबदारी, पुरोगामी मतपेढीवरही लक्ष्य
बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेनेने अनेक सामान्य माणसांना असामान्य केले. जे लोक असामान्य झाले, ते शिवसेनेतून निघून गेले. आता परत एकदा सामान्यातून असामान्य माणसे घडवण्याची वेळ आली आहे. सुषमा अंधारे यांचे मी मनापासून स्वागत करतो, अशा सांगत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सुषमा अंधारे यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी सोपविली आहे. आता त्या ही जबाबदारी कशी पेलतात, सेनेकडे आंबेडकर चळवळीतील मतपेढी वळविण्यात यशस्वी होतात का, याबाबत औत्सुक्य राहणार आहे. यापूर्वीही सेनेने शिवशक्ती-भीमशक्तीचा प्रयोग केला होता. मात्र, त्यास मोठे यश मिळाले नव्हते. आज हिंदुत्वाच्या राजकारणात भाजपाने सेनेची कोंडी केल्याचे पहायला मिळत आहे. हे पाहता नवमतदार जोडण्यात सेनेची मजल कुठवर जाते, याचीही उत्सुकता असणार आहे.
हेही वाचा : डॉ. अपूर्वा पालकर कौशल्य विद्यापीठाच्या पहिल्या कुलगुरू