पार्टीमध्ये झालेल्या गोळीबारात 3 जण ठार
वृत्तसंस्था/ इंडियाना
अमेरिकेच्या इंडियाना येथे गोळीबार झाला आहे. या घटनेत 10 जणांना गोळी लागली असून यातील 3 जणांचा मृत्यू झाला आहे. हॉलिडे पार्टीदरम्यान गोळीबाराची घटना घडली असल्याचे गॅरी पोलिसांनी सांगितले आहे. मागील 24 तासांमध्ये गोळीबाराची ही दुसरी घटना आहे. यापूर्वी सोमवारी शिकागोमध्ये फ्रीडम डे परेडदरम्यान झालेल्या गोळीबारात 6 जण मारले गेले होते.
यापूर्वी 13 जून रोजी गॅरी येथेच एका नाइट क्लबमध्ये झालेल्या गोळीबारात दोन जणांना जीव गमवावा लागला होता. या घटनेत 4 जण जखमी झाले होते. गोळीबारानंतर गॅरी येथील नाइट क्लब बंद करण्यात आले होते. सोमवारी शिकागोमधील हायलँड पार्कमध्ये गोळीबार झाला होता. अमेरिकेत मागील काही दिवसांपासून सातत्याने गोळीबाराच्या घटना घडत आहेत. या पार्श्वभूमीवर अमेरिकेत आता शस्त्रास्त्रांच्या विक्रीवर बंधने घालण्याची मागणी जोर पकडू लागली आहे.