कोल्हापूर- चित्रपट शूटिंग संपल्यानंतर फोटोग्राफी करण्यासाठी गेलेला तरुण सज्जाकोठी खाली दरीत पडला होता. गेले दहा दिवस त्याच्यावर डी वाय पाटील रुग्णालयात उपचार सुरू होते. आज पहाटेच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला असल्याची माहिती आहे. नागेश खोबरे हा गेले दहा दिवस मृत्यूशी झुंज देत होता.
काय झाली होती नेमकी घटना ?
दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या वेडात मराठे वीर दौडले सात या चित्रपटाचे सध्या किल्ले पन्हाळगडावर शूटिंग सुरू आहे. या शूटिंगसाठी नागेश खोबरे हा सुद्ध कलाकार म्हणुन आला होता. शूटिंग संपल्यानंतर नागेश हा मावळ्याच्या वेशात असल्याने तो फोटोग्राफीसाठी सज्जाकोटीच्या तटबंदीवर चढला होता. त्यावेळी पाय घसरून तो दरीत पडला. सहकाऱ्यांनी तात्काळ त्याला बाहेर काढून सीपीआर रुग्णालय, कोल्हापूरात दाखल करण्यात आले होते. मात्र प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटल, कदमवाडी येथे हलवण्यात आले होते. गेले दहा दिवस त्याच्यावर उपचार सुरू होते. अखेर आज पहाटेच्या सुमारास त्याची प्राणज्योत मालवली.