गिनिज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव नोंद
गिनिज वर्ल्ड रेकॉर्डने इराणमधील अफशिन इस्माइल घादेरजादेहला जगातील सर्वात कमी उंचीचा व्यक्ती घोषित केले आहे. गिनिज वर्ल्ड रेकॉर्डच्या पदाधिकऱयांनी घादेरजादेहची उंची मोजली असून ती मागील विक्रमापेक्षा कमी ठरली आहे. 20 वर्षीय अफशिन इस्माइल घादेरजादेह आता जगातील सर्वात कमी उंचीचा व्यक्ती असून त्याची उंची 65.24 सेंटीमीटर म्हणजेच 2 फूट 1.6 इंच इतकी आहे.
गिनिज वर्ल्ड रेकॉर्डनुसार मागील विक्रमधारकापेक्षा घादेरजादेह हा सुमारे 7 सेंटीमीटरने (2.7 इंच) उंचीने कमी आहे. यापूर्वी हा विक्रम कोलंबियातील 36 वर्षीय एडवर्ड नीनो हेरनानडेज याच्या नावावर होता.
अफशिन हा गिनिज वर्ल्ड रेकॉर्डच्या दुबईतील कार्यालयात पोहोचला होता, तेथे 24 तासांत तीनवेळा त्याची उंची मोजली गेली. तिन्हीवेळा त्याची उंची समान दिसून आल्याने त्याच्या नावावर विक्रम नोंदविला गेला आहे. दुबईत बुर्ज खलीफा पाहण्याचे स्वप्न पूर्ण करण्यापूर्वी अफशिनच्या नावावर ही कामगिरी नोंदविली गेली आहे.
अफशिन इराणच्या बुकन काउंटीमधील एका गावात राहतो. अफशिन हा कुर्दिश असून त्याला फारसी भाषा अगवत आहे. जन्मावेळी अफशिनचे वजन 700 ग्रॅम होते. तर त्याचे वजन आता 6.5 किलोग्रम असून त्याचे शरीर अत्यंत कमजोर आहे. याचमुळे त्याला मोबाइलसारखी छोष्टी गोष्टही वापरता येत नाही. अफशिनला स्वतःच्या उंचीमुळे शाळेत जाता आले नाही, याचा विपरित परिणाम त्याच्या शिक्षणावर पडला. अफशिनचा सातत्याने चालणार उपचार आणि शारीरिक थकवा यामुळे त्याने शिक्षण सोडल्याचे त्याच्या आईने सांगितले आहे.
गिनिज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव नोंद झाल्याने लोक मला ओळखतील आणि मदत करतील. मी माझी सर्व स्वप्ने पूर्ण करू शकेन अशी अपेक्षा अफशिनने व्यक्त केली आहे. अफशिनला त्याच्या मापाचे कपडे मिळत नाहीत, याचमुळे तो तीन वर्षाच्या मुलांच्या आकाराचे कपडे घालतो. अफशिन स्वतःचा बहुतांश वेळ कार्टून पाहत घालवितो.