केवळ 30 लोकांचे वास्तव्य अन् 4 श्वानांची सोबत
अमेरिकेच्या नेवादा प्रांतात एक छोटा देश असून त्याला लोक ‘रिपब्लिक ऑफ मोलोसिया’ या नावाने ओळखतात, नेवादा एक विशाल प्रांत असून तो समृद्ध खाण इतिहास आणि जंगलांसाठी ओळखला जातो. परंतु या प्रांतात एक सार्वभौम देश आहे. मोलोसिया रिपब्लिक म्हणून हा देश ओळखला जात आहे.
रिपब्लिक ऑफ मोलोसिया कार्सन सिटीपासून 30 मिनिटांच्या अंतरावर आहे. मोलासिया एक मायक्रोनेशन आहे. हा अत्यंत छोटा देश आहे. मोलोसिया दोन एकरपेक्षा कमी आकाराचे आहे. हा देश नेवादाच्या डेटन येथील कार्सन नदीच्या काठावर वसलेला आहे. देशाला मूळ स्वरुपात ग्रँड रिपब्लिक ऑफ वल्डस्टीन म्हटले जात होते, याची स्थापना 1977 मध्ये झाली होती. याचे नाव 1998 मध्ये सुमारे 20 वर्षांनी किंग्डम ऑफ मोलोसिया असे बदलण्यात आले.


मोलोसियावर केविन बॉग यांचे शासन आहे. केविन यांनी किशोवयीन असताना एका मित्रासोबत राष्ट्राची स्थापना केली होती. निडर नेत्याला विविध आयोजनांमध्ये राष्ट्राचे प्रतिनिधित्व करताना पाहिले जाऊ शकते. मोलोसिया प्रजासत्ताकमध्ये प्रेंडशिप गेटवे, बँक ऑफ किकॅसिया आणि मोलोसियन सरकारी कार्यालय आहे. या देशात कुणीही अचानक पोहोचू शकत नाही. भेट देण्यासाठी तारखा देशाच्या वेबसाइटवर पहाव्या लागतात. येथील प्रवासासाठी लोकांना मोलोसियाचे चलन वॅलोरा बाळगायला हवे. येथील राष्ट्रभाषा इंग्रजी असली तरीही एस्पेरांतो आणि स्पॅनिश भाषेतही संभाषण होऊ शकते.
या स्वयंघोषित देशाला मायक्रोनेशन म्हटले जाते. अशा देशांना संयुक्त राष्ट्रसंघाची मान्यता नसते तसेच अन्य देशांकडूनही याला मान्यता मिळत नाही. या देशाकडे स्वतःची सीमा, कायदे, बँकिंग व्यवस्था आणि सैनिक आहेत. परंतु शेजारी देश तरीही त्यांना देश म्हणून महत्त्व देत नाहीत. येथे एकूण 30 लोक राहत असून त्यांना 4 श्वानांची सोबत प्राप्त आहे.