न्या. प्रसन्न वराळे यांची कर्नाटक मुख्य न्यायाधीशपदी नियुक्ती : निपाणीच्या शिरपेचात मानाचा तुरा
अमर गुरव /निपाणी
विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेच्या माध्यमातून प्रत्येक देशवासीयाच्या जगण्याला जी लोकशाहीची चौकट घातली आहे त्या चौकटीत राहून निपाणी शहराने आजवर अनेक चळवळी, आंदोलने केली. त्याची देशाने दखलही घेतली. अशा या कर्तृत्वाच्या खाणीत अनेक रत्ने जन्माला आली. त्यापैकीच एक असलेल्या न्या. प्रसन्न वराळे यांची कर्नाटक उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी नेमणूक झाली आहे. केंद्र सरकारने नुकताच नियुक्ती आदेश दिला असून न्या. वराळे यांचे मूळ गाव असलेल्या निपाणीकरांसाठी ही निश्चितच अभिमानाची गोष्ट म्हणावी लागेल.
न्या. प्रसन्न वराळे यांचा जन्म 23 जून 1962 रोजी निपाणी येथे झाला. त्यांचे आजोबा बळवंतराव हणमंतराव वराळे हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अत्यंत निकटवर्ती म्हणून ओळखले जात होते. 1935 मध्ये डॉ. आंबेडकरांच्या बहिष्कृत हितकारणी संस्थेतर्फे धारवाड येथे स्थापन केलेल्या वसतिगृहाचे अधीक्षक म्हणून बळवंतराव काम करत होते. याचदरम्यान 1936 मध्ये म्हणजेच स्वातंत्र्यपूर्व काळात बेळगाव, निपाणी हा भाग मुंबई इलाख्यात होता. त्यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या स्वतंत्र मजूर पक्षाचे 16 आमदार मुंबई इलाख्यात निवडून आले होते. त्यापैकीच बेळगाव विभागाचे आमदार म्हणून बळवंतराव वराळे यांनी सेवा बजावली.
यानंतर बळवंतराव यांनी निपाणीत येऊन देवचंद शहा यांच्या सहकार्याने तंबाखूचा व्यवसाय सुरू केला. येथील देवचंद महाविद्यालयाच्या स्थापनेत त्यांचाही सहभाग होता. त्यांचे पुत्र असलेले भालचंद्र वराळे यांचे दहावीपर्यंतचे शिक्षण निपाणीतील म्युनिसिपल हायस्कूल येथे झाले. यानंतर त्यांनी औरंगाबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातून कायद्याची पदवी घेतली. त्यांनाही डॉ. आंबेडकरांचा सहवास लाभला. त्यानंतर त्यांनी लातूर, अकोला, शिरपूर, नांदेड, सांगली या ठिकाणी कनि÷ दिवाणी न्यायाधीश व जिल्हा न्यायाधीश म्हणून काम केले. त्यांचे पुत्र असलेल्या न्या. प्रसन्न यांचा जन्म निपाणीत झाला. त्यांचे शालेय शिक्षण लातूर व नांदेड या ठिकाणी
झाले.
वडिलांच्या प्रभावाने कायदा क्षेत्रात
वडिलांच्या प्रभावाने त्यांना कायद्याच्या अभ्यासाची आवड निर्माण झाली. यातून त्यांनी औरंगाबादच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातून कायद्याची पदवी घेतली. 1990 ते 1992 या काळात औरंगाबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर कायदा महाविद्यालयात त्यांनी प्राध्यापक म्हणून काम केले. यानंतर त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात अतिरिक्त सरकारी वकील म्हणून काम सुरू केले. 2008 पासून ते मुंबई उच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून सेवा बजावत होते. मंगळवारी राष्ट्रपतींच्या सूचनेनुसार केंद्र सरकारने न्या. प्रसन्न वराळे यांना कर्नाटक उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्तीचा आदेश जारी केला. सदर माहिती मिळताच वराळे कुटुंबीयांनी एकच जल्लोष केला.
पुतण्याचा सार्थ अभिमान
यासंदर्भात बोलताना न्या. प्रसन्न वराळे यांचे चुलते डॉ. श्रीकांत वराळे म्हणाले, लहानपणापासून पुतण्या प्रसन्न याला वक्तृत्व स्पर्धा, गायन व कलाक्षेत्रामध्ये आवड होती. त्याचे वडील न्यायाधीश असल्याने यातून त्यानेही कायद्याचे क्षेत्र निवडले. आजही वेळोवेळी निपाणीत तो घरी येऊन आपल्या तब्येतीची विचारपूस करतो. कर्नाटक उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून त्याची नेमणूक झाली ही आम्हा वराळे कुटुंबीयांसाठी अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे. यापुढेही त्याची उत्तरोत्तर अशीच प्रगती होत राहो, हाच आशीर्वाद, अशा भावना डॉ. वराळे यांनी व्यक्त केल्या.