कंग्राळी / बुद्रुक
‘मंत्रिमहोदय येती घरा तोचि दिवाळी दसरा’ या म्हणीप्रमाणे केएलई हॉस्पिटल रस्त्यावरील नेहमी रात्री बंद असणारे पथदीप शुक्रवार, शनिवार रात्री हेस्कॉमने सुरू केले. रात्री पथदीप सुरू राहण्यासाठी या परिसरात दररोज मंत्रिमहोदय येत राहो, यामुळे रस्त्यावरील पथदीप दररोज सुरू राहतील, अशा प्रतिक्रिया परिसरातील नागरिकांतून व्यक्त होत आहेत.
केएलई हॉस्पिटल रोडवरून दररोज हजारो नागरिकांची ये-जा असते. सदर रस्त्यावर वैभवनगर, कंग्राळी बुद्रुक, यमनापूर, काकती, होनगा औद्योगिक वसाहत आदी परिसरातील नागरिक, कामगार व प्रवासीवर्गाची ये-जा असते. वैभवनगर परिसराला लागून भारतीय भू-सेना खात्याची शेकडो एकर जमीन असल्यामुळे या परिसरात झाडे-झुडपे वाढलेली आहेत. परंतु दररोज रात्रीच्यावेळी सदर रस्त्यावरील पथदीप बंद असतात. यामुळे रात्री प्रवाशांना अंधाराशी सामना करावा लागतो. अंधाराचा फायदा घेऊन प्रवासीवर्गाला लुटण्याच्या अनेक घटनासुद्धा घडत असतात. परंतु मंत्रिमहोदय किंवा मोठा अधिकारी आल्यावरच हेस्कॉमला पथदीप सुरू करण्याची जाग येते का? अशा प्रतिक्रियाही नागरिकांतून व्यक्त होत आहेत.
कायम पथदीप सुरू ठेवा
सदर रस्त्यावरील पथदीप गेल्या कित्येक दिवसांपासून रात्रीच्यावेळी बंद आहेत. परंतु शुक्रवारी, शनिवारी केएलई संस्थेचे अध्यक्ष डॉ. प्रभाकर कोरे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला. के. एल. ई. परिसर व के. एल. ई. रस्ता परिसरात गेल्या कित्येक दिवसांपासून बंद असलेले पथदीप या निमित्ताने हेस्कॉमने सुरू करून परिसरात झगमगाट केला आहे. याप्रमाणे आता दररोज सदर रस्त्यावरील पथदीप रात्रीच्यावेळी सुरू ठेवून नागरिक व प्रवासी वर्गाला दिलासा देण्याची मागणी करण्यात येत आहे.