मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांचे प्रतिपादन, पाहुण्या द. आफ्रिकन संघाविरुद्ध उद्या पहिली टी-20
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
आयपीएलसारख्या स्पर्धांमध्ये भारतीय खेळाडूंनी कर्णधार म्हणून मिळवलेले यश हे राष्ट्रीय संघाच्या पथ्यावर पडणारे आहे. यामुळे कौशल्याच्या निकषावर खेळाडू अधिक बहरतो, असे निरीक्षण भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी नोंदवले. भारत-द. आफ्रिका यांच्यात उद्या (गुरुवार दि. 9) पहिली टी-20 खेळवली जाणार असून त्या पार्श्वभूमीवर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
अलीकडेच संपन्न झालेल्या आयपीएल स्पर्धेत हार्दिक पंडय़ाने गुजरात टायटन्सला पदार्पणाच्या हंगामातच विजयश्री काबीज करुन दिली तर केएल राहुल, श्रेयस अय्यर व संजू सॅमसन यांनीही आपापल्या प्रँचायझीतर्फे नेतृत्वाची धुरा सांभाळताना उत्तम चुणूक दाखवून दिली.
केएल राहुलच्या नेतृत्वाखालील लखनौ सुपर जायंट्सने आपल्या पहिल्या हंगामात प्ले-ऑफपर्यंत धडक मारली तर सॅमसनने राजस्थान रॉयल्सला उपजेतेपद मिळवून देत आपला प्रभाव दाखवून दिला.
‘युवा फलंदाज विविध प्रँचायझीचे यशस्वी नेतृत्व करत आहेत, ही बाब अतिशय सुखावणारी होती. खेळाडू व कर्णधार या नात्याने यामुळे अनेक कौशल्ये विकसित होत राहतात. कर्णधार या नात्याने विविध परिस्थितीत घेतलेले निर्णय अनुभव देऊन जातात’, असे द्रविड पुढे म्हणाले.
भारतीय संघ येथील अरुण जेटली स्टेडियमवर उद्या (गुरुवार) दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 5 सामन्यांच्या मालिकेतील पहिली टी-20 खेळणार असून यासाठी भारतीय संघात काही नवे चेहरे समाविष्ट केले गेले आहेत. हार्दिक पंडय़ा व दिनेश कार्तिक हे आयपीएलमधील धडाकेबाज मोहिमेच्या बळावरच राष्ट्रीय संघात परतत आहेत.
मागील वर्षी टी-20 वर्ल्डकपमध्ये भारतीय संघ साखळी फेरीतच गारद झाल्यानंतर संघाबाहेर फेकला गेलेल्या हार्दिक पंडय़ाला आता मुख्य प्रवाहात समाविष्ट करुन घेतले गेले आहे. त्याने फलंदाजी व गोलंदाजी या दोन्ही आघाडय़ांवर टायटन्सच्या यशात सिंहाचा वाटा उचलला. पंडय़ाप्रमाणेच दिनेश कार्तिकने देखील यंदाच्या आयपीएलमध्ये उत्तम चुणूक दाखवून दिली.
पहिला टी-20 सामना जवळपास ‘सोल्ड आऊट’!
भारत-द. आफ्रिका यांच्यातील पहिल्या टी-20 सामन्याची 94 टक्के तिकिटे काहीच अवधीत विकली गेली. अरुण जेटली स्टेडियमची प्रेक्षकक्षमता 35 हजार इतकी असून दिल्लीमध्ये नोव्हेंबर 2019 नंतर पहिलाच आंतरराष्ट्रीय सामना होत आहे. ‘94 टक्के तिकिटे विकली गेली आहेत. अवघी 400-500 तिकिटे बाकी आहेत’, असे दिल्ली जिल्हा क्रिकेट संघटनेचे सहसचिव रजन मनचंदा यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले. या सामन्यासाठी 27 हजार तिकिटे विक्रीसाठी उपलब्ध करुन दिली गेली.
धोनीचे कौशल्य आत्मसात करण्याचा प्रिटोरियसचा मानस
दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू डेव्हॉन प्रिटोरियसने महेंद्रसिंग धोनीचे दडपण हाताळण्याचे कौशल्य आत्मसात करण्याची आपली महत्त्वाकांक्षा मंगळवारी विशद केली. प्रिटोरियसचा दक्षिण आफ्रिकन टी-20 संघात समावेश आहे.
‘क्रीझवर धोनी अतिशय शांत असतो आणि हे त्याच्याकडून शिकण्यासारखे आहे. स्वतः दडपण न घेता फलंदाजी करताना गोलंदाजांवर दडपण निर्माण करण्याची त्याची हातोटी प्रशंसनीय आहे. तो यशाने सुखावून जात नाही आणि प्रसंगी अपयशाला सामोरे जावे लागले तर ते पचवण्याची त्याची तयारी असते. कोणत्याही परिस्थितीतून, कोणताही सामना जिंकता येऊ शकतो, यावर त्याचा विश्वास असतो. ज्याप्रमाणे शेवटच्या 3 चेंडूत 18 धावांचे संरक्षण करायचे असेल तर गोलंदाजाला त्यात अपयश येऊ शकते आणि यशही मिळवता येऊ शकते. संबंधित खेळाडू दडपण कसे हाताळतो, यावर बरेच काही अवलंबून असते’, असे प्रिटोरियस पुढे म्हणाला.
अष्टपैलू प्रिटोरियसने 2022 मध्ये चेन्नई सुपरकिंग्सतर्फे आयपीएल पदार्पण करत केवळ 6 सामने खेळले. त्यावेळी मुंबई इंडियन्सविरुद्ध 157 धावांचा यशस्वी पाठलाग करताना त्याने धोनीसमवेत सामना जिंकून देणारी भागीदारी साकारली होती.
भारत-द. आफ्रिका मालिकेची रुपरेषा
तारीख / लढत / वेळ / ठिकाण
9 जून / पहिली टी-20 / सायं. 7 वा. / नवी दिल्ली
12 जून / दुसरी टी-20 / सायं. 7 वा. / कटक
14 जून / तिसरी टी-20 / सायं. 7 वा. / विशाखापट्टणम
17 जून / चौथी टी-20 / सायं. 7 वा. / राजकोट
19 जून / पाचवी टी-20 / सायं. 7 वा. / बेंगळूर