शरीर मोठय़ा प्रमाणात होते वाकलेले
एक मुलगा जन्मापासूनच स्नायूंशी निगडित गंभीर समस्येला तोंड देत होता. यामुळे त्याचे शरीर वाकलेले राहायचे. अनेक डॉक्टरांकडे उपचारासाठी धाव घेण्यात आली, परंतु डॉक्टरांचे मत ऐकून हा मुलगा अधिकच घाबरून जायचा. डॉक्टर या मुलावर शस्त्रक्रिया करण्यास नकार देत होते.
या मुलाला अत्यंत गंभीर आजार असल्याचे सांगण्यात आले होते. परंतु अखेरीस एके दिवशी त्याचे जीवन बदलले आहे. या मुलाचे नाव उलरिच असून तो आफ्रिकेत राहतो. जन्मापासूनच त्याचे गुडघे डिस्लोकेटेड होते. अशा स्थितीत त्याला काठीच्या मदतीने चालावे लागत होते.
उलरिचच्या या स्थितीला कवडरिसेप्स कान्ट्राक्चूअर म्हटले जाते. या स्थितीमुळे उलराच्या स्नायूंच्या वाढीचा दर हाडांच्या तुलनेत खूपच कमी होता. यामुळे उलरिचे पाय समोरच्या बाजूने अजबप्रकारे झुकलेले होते. उलरिच जेव्हा रस्त्यावर चालायचा, तेव्हा लोक त्याच्याकडून विचित्र नजरेने पाहायचे. आपला आजार अधिकच गंभीर होत जाणार असल्याचे उलरिचला वाटू लागले होते.
उलरिचची आई जॉर्जेट जेव्हा स्वतःच्या मुलाला अशा अवस्थेत पाहायची, तेव्हा ती प्रचंड दुःखी व्हायची. कुटुंबाकडे शस्त्रक्रिया करविण्यासाठी पुरेसे पैसेही नव्हते. सर्जन माझ्या मुलाला स्पर्शही करत नव्हते, हे पाहणे अत्यंत वेदनादायी होते. उलरिचला त्रास झाल्यावर मलाही त्रास व्हायचा असे जॉर्जेट यांनी सांगितले.
आफ्रिका मर्सी चॅरिटी या संस्थेने उलरिचवरील शस्त्रक्रियेची जबाबदारी घेण्याचा निर्णय घेतल्याने कुटुंबाला मोठा दिलासा मिळाला. त्यानंतर या मुलावर शस्त्रक्रिया झाली, मग उलरिच पहिल्यांदा स्वबळावर उभा राहू शकला. शस्त्रक्रिया झाल्यावर त्याने आईची गळाभेट घेतली. पहिल्यांदाच छताला स्पर्श करू शकतोय, आता चालू देखील शकतोय असे उलरिचने म्हटले आहे.
यापूर्वी चीनमध्ये एक अशाचप्रकारचा रुग्ण आढळून आला होता. त्याचे नाव ली होते, 25 वर्षांनी त्याच्यावर शस्त्रक्रिया झाली होती आणि तो पहिल्यांदाच नीट उभा राहू शकला. हा व्यक्ती अँकिलोजिंग स्पॉन्डिलिटिसने ग्रस्त होता.