झारखंडमधील घटना : एकाचा मृत्यू, दुसऱयाची प्रकृती गंभीर
रांची / वृत्तसंस्था
झारखंडमधील गुमला येथे जमावाने दुचाकीसह अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करणाऱया दोन आरोपींना जिवंत जाळले. त्यापैकी एकाचा मृत्यू झाला, तर दुसरा गंभीर जखमी आहे. हे प्रकरण जिल्हा मुख्यालयापासून सुमारे 15 किमी अंतरावर असलेल्या सदर पोलीस स्टेशन परिसरातील बसुआ पंचायतीमधील एका गावात घडले आहे. सुनील ओराव असे मृताचे नाव असून आशिष ओरावची प्रकृती गंभीर आहे. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण होते. गावात पोलीस तळ ठोकून आहेत. याप्रकरणी गुरुवारी सकाळीही अनेकांची चौकशी करण्यात आली.
अल्पवयीन मुलगी तिच्या पालकांसह लोहरदगा येथील भंडारा येथे गेली होती. आई-वडील मुलीला घेऊन परतण्यासाठी बसस्थानकावर उभे होते. दरम्यान, गावातील एक तरुण आपल्या मित्रासोबत दुचाकीवरून तेथे पोहोचला. घरच्यांना वाटेत का उभे आहात? अशी विचारणा करत दोन्ही तरुणांनी अल्पवयीन मुलीला सोबत घेत घरी पोहोचवतो, असे सांगून निघून गेले. सायंकाळी सातच्या सुमारास पालक उशिरा घरी पोहोचले तेव्हा मुलगी घरी नव्हती. यानंतर कुटुंबीय मुलीचा शोध घेण्यासाठी बाहेर पडले असता ती शेजारच्या गावात गंभीर अवस्थेत आढळून आली. दोन्ही तरुणांनी आपल्यावर अत्याचार केल्याचे तरुणीने कुटुंबीयांना सांगितले. यानंतर कुटुंबीय दोन्ही तरुणांचा शोध घेण्यासाठी बाहेर पडले. शेजारच्या गावात दोन्ही तरुणांना दुचाकीने घेराव घातला. यानंतर गावातील महिला आणि पुरुष दोघेही तरुणांची विचारपूस करण्यासाठी पीडित मुलीच्या गावात पोहोचले. त्यानंतर संबंधित मुले सापडताच गावकऱयांनी दोन्ही मुलांना बेदम मारहाण केली. यानंतर दुचाकीसह दोघांच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून दिले.
अन् पोलिसांची घटनास्थळी धाव
घटनेची माहिती मिळताच पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. दोन्ही तरुणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. यामध्ये एका तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण आहे. दोघांना जिवंत जाळल्याची घटना घडल्यानंतर गावात मोठय़ा प्रमाणात फौजफाटा तैनात असताना पोलीस ही संवेदनशील बाब असल्याचे सांगत अधिक माहिती देण्यास टाळाटाळ करत आहेत.