ऑनलाईन टीम / तरुण भारत :
जम्मू-काश्मीरच्या शोपियां जिल्ह्यात झालेल्या चकमकीत दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात सुरक्षा दलांना यश आले. या दोन्ही दहशतवाद्यांची ओळख पटली असून, ते लष्कर-ए-तोयबाशी संबंधित होते. त्यापैकी एकाचा कुलगाममधील बँक मॅनेजर विजय कुमार यांच्या हत्येत सहभाग होता. काश्मीर आयजीपींनी यासंदर्भात माहिती दिली आहे.
मंगळवारी रात्री पोलीस आणि लष्कराच्या जवानांना शोपियानच्या कांजीउलर भागात दहशतवादी लपल्याची माहिती मिळाली. त्यानुसार शोधमोहिम हाती घेण्यात आली. कांजीउलर भागात सुरक्षा दलांचा वेढा घट्ट होताच दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर गोळीबार केला. सुरक्षा दलांनीही या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर दिले. यावेळी दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात सुरक्षा दलांना यश आले. ठार झालेल्या दोन्ही दहशतवाद्यांपैकी एकाचे नाव जान मोहम्मद असून, तो शोपियांचा रहिवाशी आहे. 2 जून रोजी कुलगाममध्ये विजय कुमार या हिंदू बँक मॅनेजरच्या हत्येमध्ये त्याचा सहभाग होता.
2 जूनला झाली होती बँक मॅनेजरची हत्या
2 जूनला सकाळीच कुलगाममधील एका बँकेत घुसून दोन दहशतवाद्यांनी बँक मॅनेजर विजय कुमार यांची गोळ्या झाडून हत्या केली होती. या घटनेने काश्मीरात खळबळ माजली होती. त्यापूर्वी एका शिक्षिकेचीही हत्या करण्यात आली होती. त्यामुळे टार्गैट किलींगचा मुद्दा उपस्थित झाला होता.