हुबळीत कारवाई : 53 लाख 10 हजार रुपये किमतीचा ऐवज जप्त : दहा गुन्ह्यांची कबुली
प्रतिनिधी / बेळगाव
माळमारुती पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रात चोरी करणाऱ्या एका त्रिकुटाला हुबळी येथील गोकुळ रोड पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याजवळून 53 लाख 10 हजार रुपये किमतीचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. या त्रिकुटाने हुबळी, धारवाड, बेळगाव व कोप्पळ येथे दहा ठिकाणी चोऱ्या केल्याची कबुली दिली आहे.
हुबळी येथील गोकुळ रोडचे पोलीस निरीक्षक जे. एम. कालिमिर्ची यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक देवेंद्र माविनंडी, व्ही. एच. मुराळ, साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक ए. जी. उमरजी, जे. सी. रजपूत, पी. एस. तगडीनमनी, आर. आर. होंकनदवर, व्ही. एस. गुडगेरी, जे. एस. मत्तीकट्टी, के. एस. गौरी, एम. एम. बेन्नूर, एस. डी. कोली, एस. के. कोरी आदींचा समावेश असलेल्या विशेष पथकाने ही कारवाई केली.
लक्ष्मीनारायण ऊर्फ राजू करिगिरीअप्पा (रा. कॅतसंद्र, जि. तुमकुर), ख्वाजा मैनुद्दीन अबुबकर फनिचंद (रा. धारवाड),
सोहेल जमीरसाब काकोळ (रा. रट्टीहळ्ळी, जि. हावेरी) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे असून बुधवार दि. 1 फेब्रुवारी रोजी हुबळी विमानतळ रोडवर या त्रिकुटाला अटक करण्यात आली आहे.
विमानतळ रोडवर वाहनांची तपासणी करताना नंबरप्लेट नसलेल्या होंडा सिटी कारमधून आलेल्या तिघा जणांना अडवून पोलिसांनी त्यांची चौकशी केली असता त्यांनी समर्पक उत्तरे दिली नाहीत. त्यामुळे पोलीस स्थानकात नेऊन त्यांची कसून चौकशी करण्यात आली. हुबळी-धारवाड या जुळ्या शहरात आठ, बेळगाव येथील माळमारुती पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रात एक व कोप्पळ येथे एक अशा एकूण दहा ठिकाणी चोऱ्या केल्याची कबुली त्यांनी दिली.
पोलिसांनी त्यांच्याजवळून 15 लाख रुपये किमतीचे 300 ग्रॅम सोन्याचे दागिने, 1 लाख 40 हजार रुपये किमतीची दोन किलो चांदी, 30 लाख रुपये किमतीच्या दोन ट्रक, 6 लाख रुपये किमतीची होंडा सिटी कार, सुमारे 70 हजार रुपये किमतीच्या वेगवेगळ्या कंपन्यांचे टी.व्ही. संच असा एकूण 53 लाख 10 हजार रुपये किमतीचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. या त्रिकुटाने राज्यातील वेगवेगळ्या ठिकाणी यापूर्वी चोऱ्या केल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे.