वृत्तसंस्था/ सिडनी
यजमान ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील येथील सिडनीच्या मैदानावर तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील शेवटची कसोटी खेळवली जात आहे. शुक्रवारी येथे सातत्याने पाऊस पडल्याने संपूर्ण दिवसाचा खेळ वाया गेला. पंचांनी किमान तीन वेळा खेळपट्टी आणि मैदानाची पाहणी करून तिसऱया दिवशाचा खेळ होऊ शकणार नाही असे जाहीर केले.
या कसोटी मालिकेत ऑस्ट्रेलियाने पहिले दोन सामने जिंकून दक्षिण आफ्रिकेवर विजयी आघाडी मिळवली आहे. ऑस्ट्रेलियाचा संघ ही मालिका एकतर्फी जिंकण्यासाठी सज्ज झाला आहे पण या शेवटच्या कसोटीतील खेळाचे तीन दिवस संपले असून आता केवळ दोन दिवस बाकी आहेत. पहिल्या दोन दिवसांच्या खेळात ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 4 बाद 475 धावा जमवल्या आहेत. उस्मान ख्वाजा 195 धावावर खेळत आहे. गुरुवारी खराब हवामानामुळे खेळ पंचांनी लवकर थांबवला होता. या सामन्याच्या सुरुवातीला मॅट रेनशॉ कोरोना चाचणीत पॉझिटीव्ह असल्याचे आढळून आले होते पण त्याचा या सामन्यासाठी संघात समावेश करण्यात आला होता. तो पाच धावावर खेळत आहे. ख्वाजाला कसोटीतील पहिले द्विशतक झळकवण्याची संधी लाभली आहे. शनिवारी हवामानामध्ये खूपच सुधारणा होऊन सूर्यप्रकाश बऱयापैकी राहिल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. या मालिकेतील ब्रिस्बेनची पहिली कसोटी ऑस्ट्रेलियाने केवळ दोन दिवसामध्ये सहा गडय़ांनी जिंकली होती. त्यानंतर मेलबर्नच्या दुसऱया कसोटीत त्यांनी दक्षिण आफ्रिकेचा एक डाव आणि 182 धावांनी दणदणीत पराभव केला होता.