सुष्मिता सेन पुन्हा मुख्य भूमिकेत
अभिनेत्री सुष्मिता सेनने दीर्घ काळानंतर 2020 मध्ये ‘आर्या’द्वारे पुनरागमन केले होते. या सीरिजमध्ये माजी मिस युनिव्हर्सने एका निडर महिलेची भूमिका साकारली होती. सुष्मिता आता ‘आर्या’च्या तिसऱया सीझनमध्ये मुख्य भूमिका साकारण्यासाठी पूर्णपणे तयार आहे. दिग्दर्शक राम माधवानी यांनी आर्याच्या तिसऱया सीझनची घोषणा केली आहे.
माधवानी यांनी इन्स्टाग्रामवर पोस्ट करत याची घोषणा केली आहे. याचबरोबर सुष्मिताने इन्स्टाग्रामवर यासंबंधी माहिती देणारी पोस्ट शेअर केली आहे. सुष्मितासाठी आर्या वेबसीरिज अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. सुष्मिताला याच वेबसीरिजद्वारे पुनरागमनाचा मार्ग मिळाला होता. ‘शेरनी नए सफर के लिए तैयार हे’ असे सुष्मिताने डिस्ने हॉटस्टारच्या पोस्टला शेअर करत म्हटले आहे. पहिल्या आणि दुसऱया सीझनमध्ये सुष्मिताने स्वतःच्या अभिनयाचा ठसा उमटविला होता.
2021 मध्ये सुष्मिताने ‘आर्या’मधील स्वतःच्या अभिनयासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार जिंकला होता. या सीरिजला 2021 मध्ये इंटरनॅशनल एमी अवॉर्ड्ससाठी देखील नामांकन मिळाले होते. आर्या सीरिजमध्ये सिकंदर खेर, अंकुर भाटिया आणि विकास कुमार देखील महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.