जर्मन चॅन्सेलर शोल्ज यांचे विधान ः
जागतिक नेत्यांना रशियाच्या आण्विक विस्ताराच्या धोक्यांबद्दल सतर्क राहायला लागेल. युक्रेनवरील रशियाचे आक्रमण प्रत्यक्षात मॉस्कोसाठी विनाशकारी परिणाम घेऊन येत आहे याची जाणीव अद्याप क्रेमलिनमधील अधिकाऱयांना झालेली नाही. युरोप खंड एका संकटाला सामोरे जात असून हा विषय जीवन-मरण्याचा असल्याचे उद्गार जर्मनीचे चॅन्सेलर ओलाफ शोल्ज यांनी काढले आहेत.
युक्रेनसोबत शांतता करार होत नाही तोवर रशियावरील निर्बंध हटविण्यात येणार नाहीत. पाश्चिमात्य देशांनी पुतीन यांच्याबद्दल कुठल्याही भ्रमात राहू नये. पुतीन कुठलाही टोकाचा निर्णय घेऊ शकतात. आंतराष्ट्रीय स्तरावर एका धोकादायक स्थितीला आम्ही सामोरे जात आहोत. दोन महिन्यांपेक्षा अधि काळापासून सुरू असलेला संघर्ष पाहता परिणाम वाईट होणार नसल्याची अपेक्षा करू शकत नाही. पुतीन यांनी दिलेल्या आण्विक हल्ल्याच्या धमकीकडे गांभीर्याने पाहण्याची गरज असल्याचे शोल्ज म्हणाले.
युद्ध युरोपीय महासंघाच्या देशांमध्ये फैलावणार असल्याची भीती अनेक जणांना वाटत आहे. युक्रेन ज्याप्रकारे मोठय़ा शौर्याने आणि अत्यंत चतुरपणे स्वतःचा बचाव करत आहे ते पाहता त्याच्याकडून आम्ही शिकवण घेण्याची गरज आह. युक्रेनियन सैन्य नेतृत्वाची कामगिरी प्रभावशाली असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
युद्धात रशियाविरोधात अन् युक्रेनसोबत ठामपणे उभे राहण्याबद्दल कुठलाच संशय नाही. युक्रेन सरकारच्या जर्मनीकडून असलेल्या अपेक्षाही वाढताना दिसून येत असल्याचे विधान शोल्ज यांनी म्हटले आहे.