प्रतिनिधी /बेळगाव
संततधार पावसामुळे राकसकोप जलाशय पूर्ण प्रमाणात भरण्याच्या मार्गावर असून त्यामुळे जलाशयाचे तीन दरवाजे काही प्रमाणात उघडण्यात आले आहेत, अशी माहिती मिळाली आहे.
पाणलोट क्षेत्रात संततधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे सहा पैकी तीन दरवाजे काही प्रमाणात उघडण्यात आले असून पाणी मार्कंडेय नदीत वाहून जात आहे. दोन दिवसांपूर्वीच प्रशासनाने यासंबंधी इशारा दिला होता. मार्कंडेय नदीचा प्रवाह वाढल्यास हिंडलगा येथील पंपिंग स्टेशनमध्ये पाणी शिरण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती.
तीन दरवाजे उघडले तरी रविवारी रात्रीपर्यंत तरी पंपिंग स्टेशन सुरक्षित होते. मार्कंडेय नदी काठावरील गावांना पुराचा फटका बसू नये याची काळजी घेत पाणी सोडण्यात येत असल्याचे अधिकाऱयांनी सांगितले. रविवारी सकाळपासून पावसाने उसंत घेतली होती. दुपारनंतर पुन्हा पावसाला सुरुवात झाली.
राकसकोप जलाशयाच्या पाणलोट क्षेत्रात संततधार सुरूच आहे. त्यामुळे यंदा जलाशय लवकर ओव्हरफ्लो झाला आहे. गेल्या वर्षी 22 जुलै रोजी राकसकोप ओव्हरफ्लो झाला होता. यंदा त्याआधीच पाणी साठय़ात वाढ झाली आहे.