पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते होणार गर्भगृहात रामलल्लाची स्थापना
अयोध्या / वृत्तसंस्था
अयोध्येत रामजन्मभूमीच्या स्थानी निर्माण होत असलेल्या भव्य राम मंदिराची पूर्तता 14 जानेवारी 2024 पर्यंत, अर्थात 2024 च्या मकरसंक्रांतीपर्यंत होणार आहे. त्याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या मंदिराच्या भव्य गर्भगृहात रामलल्लाची मूर्ती स्थापन केली जाणार आहे. राम मंदीर विश्वस्त संस्थेचे महासचिव चंपत राय यांनी ही माहिती दिली आहे. श्रीरामलल्लाची मूर्ती गर्भगृहात स्थापन झाल्यानंतर हे मंदीर सर्व भाविकांसाठी खुले केले जाणार आहे.
दिवाळीच्या निमित्ताने अयोध्येत दीपोत्सवाचे आयोजन काही दिवसांपूर्वी करण्यात आले होते. पंतप्रधान मोदी या कार्यक्रमाला उपस्थित होते. त्यांनी भव्य राम मंदिराच्या निर्माण कार्याची सविस्तर माहिती विश्वस्त संस्थेच्या पदाधिकाऱयांकडून घेतली. तसेच मंदिराचे निर्माण कार्य पूर्ण होण्यास किती समयाची आवश्यकता आहे, याचीही माहिती त्यांना देण्यात आली. त्यानुसार हे मंदीर 2024 च्या मकरसंक्रांतीपर्यंत, अर्थात 14 जानेवारी 2024 पर्यंत पूर्ण होणार आहे.
गर्भगृहापर्यंत पायऱया
या मंदिराच्या गर्भगृहाचे निर्माण कार्य वेगाने पूर्ण होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रथमच पायऱयांवरुन चढून जाऊन निर्माणाधीन गर्भगृहाचे दर्शन घेतले. त्यांनी मंदिराच्या निर्माण कार्यासाठी काही धन अर्पण केले. या मंदिराच्या निर्माण कार्यात टाटा इंजिनिअरिंग कंपनी आणि लार्सन अँड टुब्रो या कंपन्यांचे महत्वपूर्ण योगदान आहे. या कंपन्यांच्या अधिकाऱयांनीही पंतप्रधान मोदींची भेट घेतली. महाकाय यंत्रांच्या साहाय्याने मंदिराचे निर्माण कार्य जलद गतीने करण्यात येत आहे. या मंदिराचे गर्भगृह संगमरवरी खांबावर करण्यात आले आहे.
भाविकांसाठी अनेक सुविधा
या मंदिराच्या 70 एकर इतक्या भव्य परिसरात भक्त आणि यात्रेकरुंसाठी अनेक सुविधांचे निर्माण कार्यही होत आहे. भाविकांच्या निवासाची व्यवस्थाही केली जात आहे. मंदिराची सुरक्षा व्यवस्था अत्यंत बळकट ठेवा अशी विशेष सूचना पंतप्रधान मोदींनी केली आहे. मंदिराचे निर्माण कार्यही सहसप्तवधी वर्षे स्थायी राहील अशा पद्धतीने करण्यात येत आहे, अशी माहितीही देण्यात आली.