चिपळूण-चिंचनाका परिसरातील प्रकार, वाहतूककोंडी सोडवताना पोलिसांच्या आला नाकीदम
प्रतिनिधी/ चिपळूण
नळपाणी योजनेच्या पाईप दुरूस्तीसाठी नगर परिषदेके केलेल्या खोदाईत सोमवारी सकाळी ट्रक अडकला. त्यामुळे मोठी वाहतूककोंडी झाली. ही कोंडी सोडवता सोडवता पोलिसांच्या नाकीदम आला.
अर्धा शहराला पाणीपुरवठा करणारी मुख्य पाईपलाईन चिंचनाका परिसरातून गेली आहे. या पाईपलाईनला गेल्या महिनाभरात दोनवेळा गळती लागली होती. त्यामुळे तीच्या दुरूस्तीसाठी चक्क जेसीबी लावून खोदाई करण्यात आली. काम पूर्ण झाल्यावर रस्ता सुस्थितीत न आणता तसाच भराव ठेवण्यात आला होता. सुरूवातीचे काही दिवस हा भाग बंदिस्त ठेवण्यात आला होता. मात्र सध्या तो उघडा करण्यात आल्याने सोमवारी व्यापाऱयांचा माल घेऊन आलेला ट्रक त्यावर घालण्यात आला. त्यामुळे तो त्यात रूतला. या ट्रकचा मागील भाग मुख्य रस्त्यावर असल्याने एकेरी वाहने जाणेहु कठीण बनले.
त्यामुळे नेहमीच गजबजणाऱया व सध्या गणशोत्सवाच्या खरेदीमुळे या गर्दीत भर पडलेल्या चिंचनाका परिसरात मोठी वाहतूककोंडी झाली. एका बाजूने थेट मध्यवर्ती बसस्थानक, दुसऱया बाजूने नगर परिषद तर तिसऱया बाजूने साने गुरूजी उद्यानापर्यंत वाहनांच्या लांबसडक रांगा लागल्या. त्यामुळे ही कोंडी सोडवताना पोलिसांना मोठी कसरत करावी लागली. त्यानंतर पोलिसांनी संबधित ट्रक चालकाला दम भरत अर्धा तासात ट्रक बाहेर न काढल्यास कारवाई करण्याचा इशारा दिला. त्यानंतर हा ट्रक बाहेर काढण्यात आला. त्यामुळे काही तासांनी वाहतूक व्यवस्था सुरळीत झाली.
नगर परिषद कारभाराबाबत नाराजी
ही खोदाई करून अनेक दिवस झाले आहेत. तरीही नगर परिषद प्रशासन हा रस्ता सुरळीत करण्याकडे दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे अशा घटना घडत असून यामुळे एखाद्या लहान वाहनाला अपघात झाला तरी त्याला जबाबदार कोण असा सवाल उपस्थित करीत नगर परिषदेच्या या कारभाराबाबत नाराजी व्यक्त होत आहे.