Tarun Bharat

देशाचा खरा इतिहास समोर आणणार

पंतप्रधान मोदींचे महत्वपूर्ण प्रतिपादन, विरोधकांवर टीकास्त्र

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

पूर्वीच्या सरकारांनी देशाचा खरा इतिहास जाणूनबुजून लपविला आहे. आता आम्ही तो लोकांसमोर आणण्याचे महत्वाचे कार्य हाती घेतले आहे. विरोधकांनी देशाचा स्वाभिमान दाबून टाकण्याचा प्रयत्न करुन विदेशी कटकारस्थानच पुढे चालविले. आम्ही त्या चुका सुधारत आहोत. भारताचा इतिहास केवळ गुलामीचा इतिहास नाही, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.

भारताचा खरा इतिहास हा पराक्रमाचा आणि तो पराक्रम करणाऱया योद्धय़ांचा आहे. या वीरांनी अत्याचारी परकीय आक्रमकांविरोधात अभूतपूर्व शौर्य गाजविले आहे. या इतिहासाचे स्पष्ट पुरावे आहेत. मात्र, दुर्दैवाने आपल्याला स्वातंत्र्यानंतरही गुलामीचाच इतिहास शिकविण्यात आला. या इतिहासाची निर्मिती परकीय सत्तांच्या काळात एका व्यापक कटकारस्थानाच्या माध्यमातून करण्यात आली होती. खरे तर, स्वातंत्र्यानंतर असा विकृत आणि हेतुपुरस्सर लिहिलेला इतिहास पुसून टाकून खरा इतिहास शिकविण्याची आवश्यकता होती. पण संकुचित राजकीय उद्दिष्टय़े साध्य करण्यासाठी तसे करण्यात आले नाही. भारतीयांच्या पराक्रमाचा इतिहास दडविण्यात आला. आपल्या पुरातन शूरांनी धर्म आणि संस्कृतीच्या रक्षणासाठी केलेले आत्मबलिदान भारतीयांना समजूच नये अशी व्यवस्था करण्यात आली. आमचे सरकार हे कारस्थान हाणून पाडणार आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले.

सेनापती लचित यांचे योगदान

दिल्लीच्या विज्ञान भवनाच्या सभागृहात आसामचे महापराक्रमी योद्धे लचित बरफुकान यांच्या 400 व्या जयंतीनिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या समारोपाच्या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदींना बोलाविण्यात आले होते. त्यावेळी भाषण करताना त्यांनी केंद्र सरकारचे इतिहास शिक्षणासंबंधीचे धोरण स्पष्ट केले. तसेच त्यांनी लचित यांच्या पराक्रमाचे गुणगान केले.

दाखविले भारताचे सामर्थ्य

लचित यांनी परकीय आक्रमकांना आपल्या तलवारीचे पाणी पाजले होते. जर कोणी शस्त्रबळावर आम्हाला वाकवू पहात असेल किंवा आमची ओळख मिटविण्याचा प्रयत्न करीत असेल, तर त्याला धडा शिकविल्याशिवाय आम्ही राहणार नाही, हे लचित बरफुकान यांनी सिद्ध केले होते. लचित बरफुकान यांना ईशान्येचे ‘शिवाजी महाराज’ म्हणून ओळखले जाते. कारण त्यांनी शिवाजी महाराजांप्रमाणेच मोंगलाना अनेकवेळा बुद्धी आणि पराक्रमाच्या जोरावर हरविले होते. त्यांच्या स्मरणार्थ आसाममध्ये 24 नोव्हेंबरला ‘लचित दिवस’ मानला जातो.

परिवारवाद सोडा

देशाच्या नात्यापेक्षा अन्य कोणतेही नाते मोठे किंवा श्रेष्ठ असत नाही. योद्धे लचित यांच्या जीवनचरित्रावरुन आम्हाला हीच शिकवण मिळते की आपण परिवारवादाच्या बाहेर जाऊन देशासाठी कार्य केले पाहिजे. व्यक्तिगत स्वार्थाचा विचार सोडून आपण देशासाठी एकवटले पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.

अमित शहा यांचे आवाहन

भारताच्या इतिहासकारांनी देशाच्या इतिहासाचे पुनर्लेखन करावे, असे आवाहन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी याच कार्यक्रमात केले. सरकार या पुनर्लेखनाचे समर्थन करेल. आमच्या इतिहासाची येथेच्छ तोडमोड करण्यात आली आहे. हा इतिहास त्याच्या खऱया स्वरुपात मांडण्याची आवश्यकता आता निर्माण झाली आहे, असे प्रतिपादन अमित शहा यांनी आपल्या भाषणात केले आहे.

भारतीय इतिहास संशोधक मंडळाचा प्रकल्प

भारताच्या इतिहासाचे पुनर्लेखन करण्याचा एक व्यापक प्रकल्प भारतीय इतिहास संशोधक मंडळाने (आयसीएचआर) हाती घेतला आहे. भारताच्या इतिहासाचा जो भाग हेतुपुरस्सर दडविण्यात आला आहे, तो लोकांसमोर आणण्याच्या दृष्टीने हा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. आतापर्यंत जे असत्य इतिहास म्हणून खपविण्यात आले, ते उघडे पाडण्याचे कार्य या प्रकल्पाच्या माध्यमातून हाती घेण्यात आले आहे. हे इतिहासाचे पुनर्लेखन सर्व पुराव्यांनिशी आणि सत्याच्या आधारावर केले जाणार आहे. या प्रकल्पाच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला आहे. पुनर्लिखित इतिहासाचा प्रथम भाग मार्च 2023 मध्ये प्रसिद्ध करण्यात येणार आहे. या प्रकल्पात 100 हून अधिक इतिहासकारांचे योगदान होत आहे.

संस्कृती संरक्षणासाठी युवा योद्धे

देशाच्या संस्कृतीचे संरक्षण करण्यासाठी या देशातील तरुण योद्धय़ांची भूमिका बजावणार आहेत. कोणतीही बाहेरची शक्ती देशाची संस्कृती नष्ट करण्यासाठी आक्रमण करीत असेल तर या देशातील देशभक्त युवक स्वस्थ बसणार नाहीत. ते प्राणपणाने प्रतिकार करतील असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले आहे.

Related Stories

आफताब पुनावाला जामिनासाठी न्यायालयात

Patil_p

किरकोळ महागाई दरात काहीशी घट

Patil_p

दिलासादायक : जम्मू काश्मीरमध्ये दिवसभरात 1399 रुग्णांना डिस्चार्ज

Tousif Mujawar

ज्येष्ठ पत्रकार विनोद दुआ यांचं निधन

Archana Banage

खासगी प्रयोगशाळांमध्येही कोरोना चाचणी मोफत करा

Patil_p

विदेशी योगदान नियंत्रण कायद्यावर सर्वोच्च न्यायालय विचार करणार

Patil_p