नवीदिल्ली / वृत्तसंस्था
येत्या 29 नोव्हेंबरपासून ‘ट्विटर ब्लू टिक’ सेवा पुन्हा लॉन्च केली जाणार आहे. ट्विटरचे मालक एलॉन मस्क यांनीच यासंबंधी महत्त्वाची घोषणा केली आहे. ही सेवा स्थगित झाल्यानंतर आठवडाभरात पुन्हा कार्यन्वित करण्यात येईल, असे मस्क यांनी सांगितले होते. मात्र, आता या सेवेसाठी युजर्संना महिना अखेरपर्यंत वाट पाहावी लागणार आहे. ही सेवा बंद केल्यामुळे ट्विटरप्रेमींनी जोरदार टीका केली होती. तसेच एलॉन मस्क यांनी घेतलेल्या विविध निर्णयांबाबतही नाराजी व्यक्त करण्यात आली होती. आठ डॉलर्स सबस्क्रिप्शनची ‘ब्लू टिक’ सेवा दोन आठवडय़ांपूर्वी ट्विटरने सुरू केली होती. मात्र, काही युजर्सने या सेवेचा गैरवापर केल्याने ही सेवा मागे घेण्याची नामुष्की ट्विटरवर ओढवली आहे.