गुन्हे प्रकटीकरण शाखेची कारवाई; दोन गुन्हय़ातील सोने हस्तगत
वार्ताहर/ कराड
येथील कमानी मारुती मंदिर ते चावडी चौक दरम्यान मॉर्निंग वॉक करणाऱया वृद्धाच्या गळ्यातील सोन्याची चेन दुचाकीवरून आलेल्या चोरटय़ांनी हिसकावल्याची घटना महिन्यापूर्वी घडली होती. या प्रकरणी शहरातीलच दोन चोरटय़ांना शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेने अटक केली आहे. अनिकेत राहुल वाडीकर (वय 20, रा. बालाजी मंदिर, सोमवार पेठ, कराड) व नागेश तायप्पा गायकवाड (वय 20, रा. जोतिबा मंदिर, मंगळवार पेठ, कराड) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. दरम्यान, पोलिसांनी अधिक तपास केला असता रविवार पेठ येथील जैन मंदिरासमोर दुसरा एक गुन्हा केल्याचे संशयितांनी कबूल केले आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, 15 ऑक्टोबर रोजी शहरात कमानी मारुती मंदिर ते चावडी चौक या रस्त्यावर हॉटेल अनुग्रहच्या समोर मॉर्निंग वॉकला जाणाऱया वृद्धाला रस्त्यात खाली पाडून त्याच्या गळ्यातील सोन्याची चेन हिसका मारून चोरली होती. या संदर्भात अज्ञात इसमाविरुद्ध शहर पोलिसांत गुन्हा दाखल झाला होता.
पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक बापू बांगर, डीवायएसपी डॉ. रणजीत पाटील व वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित बाबर व कर्मचारी तपास करीत होते. या गुह्याचा तपास करत असताना या चेन स्नॅचिंगमध्ये वापरलेली मोटरसायकल रविवार पेठ, सोमवार पेठ, कृष्णा घाट परिसरात फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे तपास करून आरोपींना मोटरसायकलीसह पोलिसांनी अटक केली. अधिक तपास केला असता शहरात रविवार पेठ येथील जैन मंदिरासमोर दुसरा एक गुन्हा केल्याचे संबंधित आरोपेंनी कबूल केले.
सदर गुह्याचे तपासी अधिकारी उपनिरीक्षक राजू डांगे यांनी संशयितांकडे कसून व कौशल्यपूर्वक तपास करून दोनही गुह्यातील चोरीस गेलेला साडेचार तोळे वजनाच्या सोन्याच्या चेन तसेच गुन्हा करताना वापरलेली मोपेड मोटार सायकल असा एकुण 3 लाख 10 हजार रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात येश आले आहे.
गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित बाबर, उपनिरीक्षक राजू डांगे, सतीश जाधव, रघुवीर देसाई, नितीन येळवे, जयसिंग राजगे, संजय जाधव, प्रफुल्ल गाडे, आनंदा जाधव, महेश शिंदे, संतोष लोहार, रईस सय्यद, सोनाली मोहिते यांनी ही कारवाई केली
नागरिकांनी सावधगिरी बाळगावी
मॉर्निंग वॉककरीता बाहेर पडणाऱया नागरिकांनी मौल्यवान दागिने वापरू नयेत. स्वतःचा चेहरा लपवणारे मोटार सायकलस्वार आजूबाजूला फिरत असल्यास योग्य ती सावधगिरी बाळगावी. कोणताही अनुचित प्रकार घडल्यास तत्काळ पोलीस ठाण्यास संपर्क करावा, असे आवाहन शहर पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे.