Tarun Bharat

उचगाव फाटा-बेकिनकेरे रस्त्याची अक्षरशः चाळण

Advertisements

रस्त्यावर पावसाचे पाणी साचल्याने सर्वत्र खड्डेच खड्डे : दुरुस्तीकडे लोकप्रतिनिधींचे अक्षम्य दुर्लक्ष

वार्ताहर /उचगाव

उचगाव फाटा ते बेकिनकेरे महाराष्ट्र कर्नाटक सरहद्दीपर्यंतच्या सहा कि. मी. पर्यंतच्या रस्त्याचा काही भाग वगळता या रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. खड्डे आणि आता पडत असलेल्या पावसाचे पाणी या खड्डय़ांतून साचल्याने सदर रस्ता खड्डे व पाण्यातच हरवल्याचे चित्र पहावयास मिळते. परिणामी नागरिक व प्रवासीवर्गातून संताप व्यक्त करण्यात येत आहे.

उचगाव-कोवाड हा कर्नाटक महाराष्ट्र अशा दोन राज्यांना जोडणारा महत्त्वाचा मार्ग आहे. बेळगाव पश्चिम भागातील प्रवासी या मार्गे कोवाड, नेसरी, आजरा, गडहिंग्लज ते थेट कोल्हापूरपर्यंत ये-जा करत असतात.

 महाराष्ट्र-कर्नाटक सीमा हद्दीतील अतिवाड क्रॉस ते गडहिंग्लज या संपूर्ण रस्त्याचे डांबरीकरण झाले असून महाराष्ट्र हद्दीतील रस्ता वाहतुकीसाठी चांगला आहे. मात्र अवघ्या सहा कि. मी. अंतराच्या कर्नाटक हद्दीतील रस्त्याची चाळण झाली आहे. या रस्त्यावरील दोन ठिकाणी वीस मीटरचे भाग फक्त डांबरीकरण करून उर्वरित रस्ता तसाच सोडण्यात आला आहे. संपूर्ण रस्त्याची दुरुस्ती व डांबरीकरण करणे गरजेचे असताना देखील याकडे दुर्लक्ष केले गेले आहे. रस्त्यावर अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असून या खड्डय़ातून सध्या पाणी साचल्याने काही भागात तर रस्त्यावर ओढय़ाचेच स्वरूप निर्माण झाले आहे. खड्डय़ांचा आणि पाण्याचा अंदाज येत नसल्याने या खड्डय़ात दुचाकी, चारचाकी वाहने अडकणे, नादुरुस्त होणे असे प्रकार घडत असून किरकोळ अपघातही घडत आहेत. या संपूर्ण रस्त्यावरील खड्डे तरी बुजवावेत, अशी मागणी करण्यात येत आहे.

…अन्यथा रास्ता रोकोचा इशारा

 या भागाच्या लोकप्रतिनिधींनी या मार्गावरून अनेकवेळा प्रवास केला आहे. मात्र या खड्डय़ांचा त्यांना अनुभव आला की नाही, असा प्रश्न नागरिकांतून विचारला जात आहे. लोकप्रतिनिधींनी तातडीने आठ दिवसाच्या आत हे खड्डे बुजवावेत. अन्यथा रास्ता रोको आंदोलन छेडण्याचा इशारा उचगाव, बेकिनकेरे, बसुर्ते भागातील नागरिकांकडून देण्यात आला आहे.

error: Content is protected !!