यरमाळ येथील युवकाला पोलिसांकडून अटक : बेळगाव ग्रामीण पोलिसांची कारवाई
प्रतिनिधी / बेळगाव
रेल्वेत नोकरी लावण्याचे आमिष दाखवून बेरोजगार तरुणांना गंडविणाऱया यरमाळ (ता. बेळगाव) येथील एका युवकाला अटक करण्यात आली आहे. शुक्रवारी ही कारवाई करण्यात आली असून केवळ बेळगावच नव्हे तर गोकाक, रामदुर्ग, मुधोळ, लोकापूर परिसरातील 15 हून अधिक तरुणांची फसवणूक झाल्याची माहिती मिळाली आहे.
राजू श्रीमंत पाटील (वय 32, रा. यरमाळ) असे पोलिसांनी अटक केलेल्या युवकाचे नाव आहे. कोंडसकोप येथील नागराज अशोक पाटील या तरुणाने दिलेल्या फिर्यादीवरून बेळगाव ग्रामीणचे पोलीस निरीक्षक श्रीनिवास हंडा, उपनिरीक्षक लक्काप्पा जोडट्टी व त्यांच्या सहकाऱयांनी शुक्रवारी राजूला अटक केली आहे.
2019 मध्ये नागराजने नोकरीसाठी राजूला 4 लाख रुपये दिले होते.
नोकरी तर नाहीच, घेतलेले पैसेही त्याने परत केले नाहीत. गुरुवार दि. 20 ऑक्टोबर रोजी रात्री नागराजने यासंबंधी फिर्याद दिली. पोलिसांनी तातडीने यरमाळ येथील राजूला अटक केली असून त्याने सुमारे 15 जणांची फसवणूक केल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे.
तपास अधिकाऱयांनी दिलेल्या माहितीनुसार रेल्वेत नोकरी लावण्याचे सांगून बेरोजगार तरुणांकडून राजूने सुमारे 65 लाख रुपये उकळले आहेत. पोलिसांना 9 जणांची नावे मिळाली आहेत. यापैकी दोघा जणांना त्याने बनावट नेमणूकपत्रही दिले होते. रेल्वेत नोकरी लावण्याचे सांगून त्याने अजून किती जणांची फसवणूक केली आहे? याचा बेळगाव ग्रामीण पोलीस तपास करीत आहेत.