वृत्तसंस्था/ इस्लामाबाद
ऑस्ट्रेलियात ऑक्टोबर-नोव्हेंबर दरम्यान होणाऱया टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत सहभागी होणाऱया पाक क्रिकेट संघातील क्रिकेटपटूंसाठी पीसीबीने आकर्षक नवी जर्सी उपलब्ध करून दिली असून सोमवारी या जर्सीचे अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत अनावरण करण्यात आले.
पाक क्रिकेट मंडळातर्फे (पीसीबी) नव्या जर्सीच्या अनावरण समारंभाचे चित्रिकरण इन्स्टाग्रामवर प्रसिद्ध करण्यात आले. पाक क्रिकेटपटूंना या स्पर्धेसाठी उपलब्ध करून देण्यात आलेली जर्सी आकर्षक रंगात तयार करण्यात आली असून या जर्सीवर पाक टी-20 थंडर जर्सी 22 असे लिहिण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी पाक संघाचे नेतृत्व बाबर आझमकडे सोपविण्यात आले आहे. पीसीबीने या स्पर्धेसाठी 15 जणांचा संघ जाहीर केला असून पाकचा या स्पर्धेतील सलामीचा सामना 23 ऑक्टोबर रोजी भारताबरोबर होणार आहे. या महत्त्वाच्या स्पर्धेसाठी पाक संघात वेगवान गोलंदाज शाहिन शहा आफ्रिदीचे पुनरागमन झाले आहे.
अलीकडेच झालेल्या आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत शाहिन आफ्रिदी दुखापतीमुळे सहभागी झाला नव्हता. काही दिवसापूर्वी उजव्या गुडघ्याला झालेल्या दुखापतीमुळे आफ्रिदीला सहा आठवडे विश्रांती घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला होता. गेल्या जुलैमध्ये गॅले येथे झालेल्या लंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीत क्षेत्ररक्षण करताना आफ्रिदीला ही दुखापत झाली होती.
टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेपूर्वी पाक संघाची सात सामन्यांची टी-20 मालिका इंग्लंडविरुद्ध पाकमध्ये खेळविली जाणार आहे. ही मालिका दोन्ही संघांच्या दृष्टीने महत्त्वाची राहिल. या मालिकेतील 20, 22, 23 आणि 25 सप्टेंबर रोजी होणारे चार सामने नॅशनल स्टेडियमवर खेळविले जाणार आहेत. त्यानंतर या मालिकेतील उर्वरित तीन सामने 28, 30 सप्टेंबर तसेच 2 ऑक्टोबर रोजी गदाफी स्टेडियमवर होतील.
पाक टी-20 विश्वचषक संघ-बाबर आझम (कर्णधार), शदाब खान (उपकर्णधार), असिफ अली, हैदर अली, हॅरीस रौफ, इफ्तिकार अहमद, खुशदील शहा, मोहम्मद हसनेन, मोहम्मद नवाज, मोहम्मद रिजवान, मोहम्मद वासीम, नसाम शहा, शाहिन शहा आफ्रिदी, शान मसूद आणि उस्मान कादीर. राखीव खेळाडू- मोहम्मद हॅरीस आणि शाहनवाज दहानी.