पुणे / प्रतिनिधी :
मी मंत्रिपद मागणार नाही. भाजपला गरज वाटली, तर मला ते मंत्री करतील. मात्र, मी युती धर्म पाळणार आहे, असे राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी स्पष्ट केले. आगामी महापालिका आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रासप स्वबळावर लढणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
कसबा पेठ मतदारसंघ पोटनिवडणुकीतील भाजप, बाळासाहेबांची शिवसेना व मित्र पक्षाचे उमेदवार हेमंत रासने यांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी भाजप प्रवक्ते संदीप खर्डेकर, बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे संपर्क प्रमुख अजय भोसले आदींसह भाजप व रासपचे पदाधिकारी उपस्थित होते.
आमदार गोपीचंद पडळकर भाजपमध्ये आल्यापासून भाजप आपल्याकडे दुर्लक्ष करत आहे का? या प्रश्नावर बोलताना जानकर म्हणाले, पडळकर भाजपचा कार्यकर्ता आहे आणि मी रासपचा राष्ट्रीय नेता आहे. त्यामुळे गरज वाटली तर भाजप मला मंत्रीपद दिले जाईल. पण, मी काही मागणार नाही. मी मागणारा नाही, तर देणारा नेता आहे. मी युती धर्म पाळणारा नेता आहे. त्यामुळे मी आज माझी टीम घेवून महायुतीचे उमेदवार हेमंत रासने यांच्या विजयासाठी पुण्यात आलो आहे. रासने व भाजपने मला बारामती लोकसभेच्या निवडणुकीत खडकवासल्यात चांगली मदत केली. त्यामुळे रासने यांच्या विजयासाठी आम्ही आमची ताकत त्यांच्या मागे उभी करत आहोत.
अधिक वाचा : परीक्षा केंद्रांवर प्रतिबंधात्मक आदेश जारी
महापालिका स्वबळावर लढण्याचा निर्धार
राष्ट्रीय समाज पक्षाचे जाळे चार राज्यांत पसरले असून, आणखी विस्तार कसा होईल याकडे आमचे लक्ष आहे. गुजरातमध्ये 28 नगरसेवक, तर एक नगरसेवक बेंगळूरमध्ये आहे. एक जिल्हा परिषद सदस्य गुवाहाटी येथे असून, मी उद्या तिकडे जाणार आहे. महाराष्ट्रमध्ये झालेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत 98 सदस्य निवडून आले आहेत. तर आजपर्यंत चार आमदार हे रासपचे निवडून आले आहेत. मी जरी महायुतीसोबत असलो, तरी आगामी महापालिका आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रासप स्वबळावर लढणार असल्याचेही जानकर यांनी यावेळी स्पष्ट केले.