मटण-बिफ मार्केटच्या लिलावाकडे गाळेधारकांची पाठ : बोलीची रक्कम पोहोचली 25 हजारांवर
प्रतिनिधी /बेळगाव
महापालिकेचे 93 व्यापारी गाळे भाडेतत्त्वावर देण्यासाठी मंगळवारी लिलाव आयोजित केला होता. लिलाव प्रक्रियेत कोलकार मार्केट व चावी मार्केटमधील गाळय़ांसाठी चढाओढ लागल्याने बोलीची रक्कम 25 हजारांवर पोहोचली. मात्र कसाई गल्ली येथील फिश मार्केट आणि मटण मार्केटच्या गाळय़ांना प्रतिसाद मिळाला नाही.
न्यायालयाच्या परवानगीनंतर 180 गाळे भाडेतत्त्वावर देण्यासाठी लिलाव प्रक्रिया राबविण्यात येत आहे. लिलावाच्या पहिल्या दिवशी 70 पैकी केवळ 8 गाळय़ांना बोली लागली. तर मंगळवारी 93 गाळे भाडेतत्त्वावर देण्यासाठी लिलाव आयोजित करण्यात आला होता. यामध्ये कसाई गल्लीतील मटण मार्केटचे 40 गाळे आणि बिफ मार्केटमधील 12 गाळय़ांचा समावेश होता. त्याचप्रमाणे कोनवाळ गल्ली व कसाई गल्लीतील कत्तलखाना आणि बकरी शेड भाडय़ाने देण्यात येणार आहे. तसेच कोलकार मार्केट, चावी मार्केट, अनगोळ नाका, धारवाड रोड, टिळकवाडी येथील नवीन भाजीमार्केट आदी परिसरातील गाळे भाडेतत्त्वावर देण्यासाठी बोली लागली. मात्र कोलकार मार्केट व चावी मार्केटमधील गाळे घेण्यासाठी नागरिकांचा भरपूर प्रतिसाद होता. त्यामुळे हे गाळे घेण्यासाठी बोलीवेळी चढाओढ झाली. तब्बल 25 हजारांपर्यंत बोली पोहोचली. मात्र कसाई मार्केट व अन्य गाळय़ांसाठी प्रतिसाद लाभला नाही. 93 गाळय़ांपैकी केवळ 10 गाळय़ांना बोली लागली.
यावेळी मनपा महसूल उपायुक्त प्रशांत हनगंडी, महसूल अधिकारी संतोष अनिशेट्टर, फारूक यड्रावी, बाबू माळन्नावर, महसूल निरीक्षक मल्लिक गुंडप्पण्णावर, कायदा अधिकारी यु. डी. महांतशेट्टी व इतर अधिकारी उपस्थित होते.
बोली थांबविण्यासाठी सेटिंग
काही नागरिकांनी बोली प्रक्रियेस स्थगिती आणण्यासाठी न्यायालयात धाव घेतली होती. पण न्यायालयाने याला स्थगिती दिली नाही. त्यामुळे लिलाव प्रक्रिया पार पडली. विद्यमान व्यावसायिकांबरोबर अन्य नागरिकांनीदेखील लिलाव प्रक्रियेत भाग घेतला होता. कोणत्याही परिस्थितीत गाळा आपल्या हातून जावू नये, याकरिता लिलाव प्रक्रियेत भाग घेतलेल्या अन्य नागरिकांबरोबर आर्थिक व्यवहार करून बोली थांबविण्यासाठी सेटिंग केली होती.